औरंगाबाद बाजार समितीवर प्रशासक नियुक्तीचा आदेश रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 07:28 PM2021-03-02T19:28:31+5:302021-03-02T19:30:42+5:30
राज्य शासनाने राज्यातील मुदत संपलेल्या आणि कोरोनामुळे निवडणुका होऊ न शकलेल्या काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ६ महिन्यांची मुदतवाढ दिली होती.
औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नियुक्तीचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस. डी. कुलकर्णी यांनी सोमवारी (दि. १ मार्च) रद्द केला. विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याबाबत शासनाने निर्णय घ्यावा. दरम्यान, या संचालक मंडळाने कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ नये, असे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे.
राज्य शासनाने राज्यातील मुदत संपलेल्या आणि कोरोनामुळे निवडणुका होऊ न शकलेल्या काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ६ महिन्यांची मुदतवाढ दिली होती. मात्र, औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला मुदतवाढ दिली नव्हती. औरंगाबाद बाजार समितीची मुदत ५ ऑगस्ट रोजी संपली आहे. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाला पुढील ६ महिने मुदतवाढ द्यावी, यासाठी राधाकिशन पठाडे व अन्य १३ संचालकांनी ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली होती.
दरम्यान, संचालक मंडळाची मुदत संपल्यामुळे सहकार आयुक्तांनी जिल्हा उपनिबंधक यांची प्रशासकपदी नियुक्ती केली होती. त्यांच्या या नियुक्तीला खंडपीठात आव्हान देण्यात आले होते. संचालक मंडळातर्फे ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे, कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे ॲड. एम. एस. कराड आणि शासनातर्फे सहायक सरकारी वकील सुजित कार्लेकर यांनी काम पाहिले.