सोमवारी निघतील महापालिकेच्या आकृतिबंधाच्या मंजुरीचे आदेश : एकनाथ शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 08:17 PM2021-02-13T20:17:07+5:302021-02-13T20:18:44+5:30
Aurangabad Municipal Corporation ‘स्व’निधी उभारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी नवीन उत्पन्न स्रोत निर्माण करावेत, यासाठी शासन सर्वोतोपरी मदत करेल
औरंगाबाद : नगर विकासमंत्री एकनाथ शिंदेऔरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांनी सकाळी महापालिकेत आढावा बैठक घेतली. यावेळी आजी-माजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी महापालिकेचा नोकर भरती संदर्भातील आकृतीबंध मंजूर करावा अशी गळ शिंदे यांना घातली. त्यावर सोमवारी या संदर्भात आदेश निघतील अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा विषय मार्गी लागणार आहे.
आज महानगरपालिका मुख्यालय येथील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे सभागृह येथे एकत्रित विकास नियमावली (युनिफाईड डिसीआर )अंमलबजावणी व विकास कामांची आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी महापालिका आकृतिबंधच्या विषयी मंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, येत्या सोमवारी शासन निर्णय निघणार आहे. यामुळे महानगरपालिकेतील रिक्त जागा भरणे व पदोन्नती देण्याचा मार्ग मोकळा होईल. तसेच प्रास्ताविक विकास आराखड्यानुसार डीपी रोड बाबतची आखणी वारंवार करावी. जेणे करून अनधिकृत बांधकामे होणार नाहीत आणि नागरिकांना याची जाणीव व्हावी असे मत विकास आराखड्यावर त्यांनी मांडले. याची महापालिकेने त्वरित अंमलबजावणी करावी असे आदेशही त्यांनी दिले.
महापालिकेने स्व-निधी उभारावा
महापालिकेने आपल्या उत्पन्नात वाढ करून शासनाच्या विविध योजनेतील हिस्सा टाकावा. ‘स्व’निधी उभारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी नवीन उत्पन्न स्रोत निर्माण करावेत, यासाठी शासन सर्वोतोपरी मदत करेल, असेही त्यांनी सांगितले.