आमदार पोहोचण्यापूर्वीच निघाले आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:27 AM2018-10-24T00:27:33+5:302018-10-24T00:27:56+5:30
औरंगाबाद : जायकवाडी धरणात वरच्या धरणांतून पाणी सोडण्यासंदर्भात मंगळवारी सकाळीच आमदार प्रशांत बंब आणि संदीपान भुमरे यांनी गोदावरी मराठवाडा ...
औरंगाबाद : जायकवाडी धरणात वरच्या धरणांतून पाणी सोडण्यासंदर्भात मंगळवारी सकाळीच आमदार प्रशांत बंब आणि संदीपान भुमरे यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ गाठले; परंतु ते पोहोचण्यापूर्वीच पाणी सोडण्याचे आदेश काढण्यात आले होते. याठिकाणी पोहोचताच त्यांच्या हातात आदेशाची प्रत देण्यात आली. त्यामुळे आदेश आपल्यामुळेच निघाले, असे श्रेय कोणालाही घेता आले नाही,अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी सोमवारी वज्रमूठ आवळली. यावेळी सरकारने समन्यायी पाणीवाटपाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली. जायकवाडीच्या पाण्यासाठी बुधवारी जलसंपदामंत्र्यांची भेट घेण्याचा आणि त्यांच्याकडून न्याय मिळाला नाही, तर मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्याचा निर्णयही बैठकीत झाला. दुसरीकडे याच दिवशी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने जायकवाडीत तात्काळ पाणी सोडण्याचे निर्देश दिले.
पाणी सोडण्यासंदर्भात सोमवारी झालेल्या चर्चा आणि प्राधिकरणाच्या निर्देशानंतर मंगळवारी सकाळी आमदार प्रशांत बंब आणि संदीपान भुमरे हे महामंडळात पोहोचले. याठिकाणी ते पोहोचल्यानंतर त्यांना थेट काढण्यात आलेल्या आदेशाची प्रत देण्यात आली. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी १०.३० वाजताच आदेश काढले होते. या आदेशाची प्रत या दोन्ही लोकप्रतिनिधींना ११ वाजता देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आदेश आपल्यामुळेच निघाले, असे श्रेय घेण्यात येणार होते; परंतु थेट आदेशाची प्रतच हातात पडल्याने हा डाव फसल्याची चर्चा चांगलीच रंगली होती.
१५० टीएमसी पाण्यासाठी प्रयत्न
जायकवाडीत वरच्या धरणातून पाणी सोडण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे जलसंपदामंत्री, मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे तूर्तास रद्द केले आहे; परंतु १५० टीएमसी पाण्याची तूट भरून काढण्यासाठी यापुढे प्रयत्न केले जाईल. त्यासाठीही सगळ्या लोकप्रतिनिधींशी चर्चा केली जाईल. पाणी सोडण्यासंदर्भातील आदेशाची प्रत घेण्यासाठीच महामंडळात गेलो होतो, असे आ. प्रशांत बंब यांनी सांगितले.