शहरातील जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 10:26 PM2019-04-21T22:26:59+5:302019-04-21T22:27:16+5:30
शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये असलेले जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश अपर तहसीलदार रमेश मुंदलोड यांनी काढले आहेत.
औरंगाबाद : शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये असलेले जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश अपर तहसीलदार रमेश मुंदलोड यांनी काढले आहेत. दी मेडोज, विवांता औरंगाबाद, लेमन ट्री, अॅम्बेसेडर अजंता, वेलकम रामा इंटरनॅशनल, विटस्, जिमखाना क्लब, एमजीएम स्पोर्टस् क्लब, हॉटेल ए.एस.क्लब यांना महसूल प्रशासनाने जलतरण तलाव तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाले आहे. शहरासाठी जायकवाडी मृत जलसाठ्यातून पाणीपुरवठा होत आहे. आठवड्यातून एकच दिवस नळाद्वारे ४५ मिनिटे पाणीपुरवठा होत आहे. शहर व परिसरात पाण्याची प्रचंड टंचाई आहे. त्यामुळे पुढे पाणीपुरवठा होऊ शकेल किंवा नाही, याची खात्री नाही.
धरणातील उपलब्ध जलसाठा पाहता पुरेसा पाऊस पडेपर्यंत जलतरण तलाव बंद करण्यात यावेत. भीषण पाणीटंचाई परिस्थिती पाहता तलाव तातडीने बंद न केल्यास आदेशाचे उल्लंघन केल्यास नैसर्गिक आपत्ती कायदा २००५ नुसार कारवाई करण्याचा इशारा अपर तहसीलदार मुंदलोड यांनी नोटीसद्वारे दिला आहे.