वाकला चांदेश्वर जलप्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:05 AM2021-07-20T04:05:41+5:302021-07-20T04:05:41+5:30
वैजापूर तालुक्यातील वाकला-चांदेश्वर जलप्रकल्प तांत्रिक अडचणी व काही कारणास्तव शासनस्तरावर प्रलंबित होता. सुरुवातीला सदरील महत्त्वपूर्ण मूळ प्रकल्प हा जलसंपदा ...
वैजापूर तालुक्यातील वाकला-चांदेश्वर जलप्रकल्प तांत्रिक अडचणी व काही कारणास्तव शासनस्तरावर प्रलंबित होता. सुरुवातीला सदरील महत्त्वपूर्ण मूळ प्रकल्प हा जलसंपदा विभागाकडूनच पूर्ण होणार होता; परंतु ६०० हेक्टर्सपेक्षा कमी सिंचनक्षमता असल्याचे कारण देऊन जलसंपदा विभागाकडून जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. जलसंधारण विभागाकडे अनुभवी नसणाऱ्या मनुष्यबळाचा विचार केल्यास हा प्रकल्प सर्वेक्षण व बांधकामासाठी जलसंपदा विभागाकडेच ठेवणे योग्य असल्याचे सर्वांचे एकमत होते. खा. इम्तियाज जलील यांच्यासह नागरिकांनी सतत तीन पाठपुरावा केला. यानंतर हा जलप्रकल्प जलसंपदा विभागाकडे हस्तांतरित करून काम त्वरित पूर्ण करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास मंडळाला दिले आहेत. यामुळे माजीद शेख, सरपंच जयनाथ त्रिभुवन, उपसरपंच दिलीप निकम, अन्वर पठाण, परवेज पठाण आदींसह ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.
चौकट
या गावांना होणार फायदा
वाकला-चांदेश्वर जलप्रकल्प पूर्ण झाल्यास घाटमाथ्यावरील कुसुमतेल, जातेगाव, वाकला, जवळकी, गोंडेगाव, चांदेश्वर व तलवाडा सह इतर गावांना फायद्याचा ठरणार आहे. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या विहिरीच्या पाणी पातळीतसुद्धा वाढ होणार असून डोंगराळ भागातील वन्यप्राण्यांनाही उन्हाळ्यात पिण्याचे पाणी उपलब्ध राहणार आहे.