मराठा उमेदवारांपेक्षा कमी गुण असल्यास ईडब्ल्यूएस प्रवर्गातून नियुक्त्या न देण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:06 AM2021-01-03T04:06:26+5:302021-01-03T04:06:26+5:30
महाजनको मध्ये निवड झालेल्या मराठा उमेदवाराला संरक्षण औरंगाबाद : महाजनको या शासकीय कंपनीमध्ये टेक्निशियन-३ या पदांकरिता ईडब्ल्यूएस प्रवर्गातील निवड ...
महाजनको मध्ये निवड झालेल्या मराठा उमेदवाराला संरक्षण
औरंगाबाद : महाजनको या शासकीय कंपनीमध्ये टेक्निशियन-३ या पदांकरिता ईडब्ल्यूएस प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना मराठा समाजातील एसईबीसी प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांपेक्षा कमी गुण असतील तर अशा उमेदवारांना नियुक्ती न देण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. विभा कंकनवाडी यांनी २९ डिसेंबर रोजी दिले. योगेश अण्णा जाधव यांनी ॲड. विशाल कदम यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती.
मराठा आरक्षणाला स्थगिती येण्यापूर्वीच कागदपत्र पडताळणी पूर्ण झालेली असल्याने व नियुक्तीप्रक्रिया संपत आलेली असताना याचिकाकर्त्यांना प्रवर्ग बदलण्याचा अधिकार नाही, म्हणून स्थगिती देवू नये, असा युक्तिवाद महाजनकोच्या ए. एम. गायकवाड यांनी केला. ईडब्ल्यूएससाठी जे उमेदवार पात्र आहेत, त्या उमेदवारांसाठी शासनाने २३ डिसेंबर रोजी शासन निर्णय पारित केलेला आहे, अशी माहिती राज्य सरकारचे वकील ज्ञानेश्वर काळे यांनी न्यायालयास दिली. याचिकाकर्त्यांना न्यायालयाने संरक्षण दिले असून इतर ईडब्ल्यूएस प्रवर्गामधील उमेदवारांना मुंबईमधील नितीन मस्के यांच्या याचिकेच्या निकालाच्या अधीन राहून नियुक्ती देण्यास हरकत नसल्याचे न्यायालयाने म्हंटले आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. सुमित कुलकर्णी, ॲड. विशाल कदम आणि ॲड. स्नेहल जाधव यांनी युक्तिवाद केला .