‘नांमका’त पाणी सोडण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:08 AM2017-07-21T01:08:51+5:302017-07-21T01:14:28+5:30
वैजापूर : नांदूर-मधमेश्वर जलद कालवा लाभक्षेत्रातील वैजापूर, गंगापूर आणि कोपरगाव तालुक्यात खरीप सिंचनासाठी दीड टीएमसी पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैजापूर : तब्बल एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप क्षेत्र संकटात आले आहे. त्यामुळे कालव्यात पाणी सोडण्यासाठी लोकप्रतिनिधींसह शेतकऱ्यांचा पंधरा दिवसांपासून संघर्ष सुरु होता. अखेर नांदूर-मधमेश्वर जलद कालवा लाभक्षेत्रातील वैजापूर, गंगापूर आणि कोपरगाव तालुक्यात खरीप सिंचनासाठी दीड टीएमसी पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या मंत्रालयात बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
गुरूवारी सकाळी सात वाजता कालव्यात ‘टेल टू हेड’ या धोरणानुसार पाणी आवर्तन तिन्ही तालुक्यांसाठी सोडण्यात आले.
नाशिक पाटबंधारे विभागाने कालव्यात ‘ओव्हरफ्लो’ चे पाणी सोडण्यास विरोध दर्शविल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. काही शेतकऱ्यांनी थेट नाशिक येथे जाऊन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली. तसेच तालुक्यातील २९ ग्रामसभेचे ठराव शेतकऱ्यांनी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्याकडे दिले होते. त्यानुसार औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही पाटबंधारे विभागाच्या सचिवांना पत्र पाठवून पाणी सोडण्याबाबत कळवले होते. शेतकऱ्यांमधील संतापाची भावना लक्षात घेऊन नांदूर -मधमेश्वर कालवा विभागानेही पाणी सोडण्याबाबत प्रस्ताव पाठवला होता. त्यामुळे कालव्यातून पाणी कधी सोडले जाणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. मंत्रालयात बुधवारी वैजापूर येथील नांदूर-मधमेश्वर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी. ए. पाटील, उपअभियंता प्रशांत वनगुजरे व अभियंता युसूफ पठाण यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे सचिव डॉ. निशिकांत देशपांडे यांची भेट घेऊन तालुक्यातील खरीप क्षेत्राच्या बिकट परिस्थितीबाबत लक्ष देऊन कालव्यात पाणी सोडण्याची मागणी केली. त्यामुळे सचिव देशपांडे यांनी गुरुवारपासून वैजापूर, गंगापूर व कोपरगाव तालुक्यासाठी दीड टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश नाशिक पाटबंधारे विभागाला दिले.
सध्या नाशिक जिल्ह्यातील मुकणे धरणात (२८.७५) टक्के पाणी साठा आहे. भावली धरणात (९६.५७) टक्के व वाकी धरणात (२४.८८) टक्के पाणी आहे. या तिन्ही धरणातून गुरुवारी सकाळी सात वाजता ३०० ते ७५० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे.
हे पाणी जलदगती कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून साधारणपणे वीस दिवसांच्या आवर्तनातून दीड टीएमसी पाणी तिन्ही तालुक्यांना मिळणार आहे.