मंगळसूत्र चोर पोलिसाच्या निलंबनाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 08:56 PM2018-10-15T20:56:45+5:302018-10-15T20:58:32+5:30
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याच्या गुन्ह्यात सातारा पोलिसांनी अटक केलेला पोलीस कॉन्स्टेबल योगेश सुरेश शिंगनारे याच्या निलंबनाचे आदेश सोमवारी भारत बटालियन प्रशासनाने जारी केले.
औरंगाबाद : महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याच्या गुन्ह्यात सातारा पोलिसांनी अटक केलेला पोलीस कॉन्स्टेबल योगेश सुरेश शिंगनारे याच्या निलंबनाचे आदेश सोमवारी भारत बटालियन प्रशासनाने जारी केले. तो सध्या पोलीस कोठडीत असून, न्यायालयाच्या परवानगीने या आदेशाची अंमलबजावणी होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
भारत बटालियनमध्ये २००७ पासून कार्यरत असलेला योगेश सुरेश शिंगनारे याला मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यात सातारा पोलिसांनी १२ आॅक्टोबर रोजी रात्री सापळा रचून पकडले. तो सध्या पोलीस कोठडीत असून, त्याने आठ महिलांचे मंगळसूत्र हिसकावल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. एवढेच नव्हे तर मंगळसूत्र हिसकावून नेलेले घटनास्थळही त्याने पोलिसांना दाखविले आहेत. जुगारात पैसे हरल्याने आणि चार लाख रुपयांचे कर्ज डोक्यावर झाल्याने मंगळसूत्र चोरीसारख्या गंभीर गुन्ह्याकडे वळल्याची कबुली त्याने दिली. महिलांच्या हिसकावून नेलेल्या सोनसाखळया विक्री केलेल्या सराफ्यांची दुकानेही त्याने पोलिसांना दाखविली. आरोपी योगेश हा सरकारी कर्मचारी असल्याने सातारा पोलिसांनी त्याच्या अटकेची आणि पोलीस कोठडीचा गोपनीय अहवाल भारत बटालियनच्या समादेशकांना पाठविला. यासंदर्भात समादेशक माटे म्हणाले की, जवान योगेश शिंगनारे याच्या निलंबनाचे आदेश सोमवारी जारी करण्यात आले. हे आदेश सातारा ठाण्याला पाठविण्यात आले. मात्र तो सध्या पोलीस कोठडीत असल्याने त्याच्यावरील निलंबनाची कार्यवाही लगेच करणे शक्य नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले आहे. मंगळवारी त्याच्या पोलीस कोठडीचा कालावधी संपुष्टात येत असल्याने त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर न्यायालयाच्या परवानगीने त्याला निलंबनाचे आदेश दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
११ तोळ्यांचे दागिने जप्त
दरम्यान योगेशकडून सोने खरेदी करणाºया तीन सराफ्यांकडून ११ तोळ्यांचे दागिने जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांनी दिली. ते म्हणाले की, आरोपीकडून चोरीचे दागिने खरेदी करणाºया दुकानदारांची दोन दिवसांपासून पोलीस चौकशी करीत आहेत.