अवयवदान चळवळ थंडावली; मूत्रपिंड, यकृत मिळण्याची ३४२ जणांना प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 08:06 PM2020-01-13T20:06:52+5:302020-01-13T20:09:12+5:30
औरंगाबादेत १५ जानेवारी २०१६ रोजी पहिले अवयवदान झाले आणि मराठवाड्यात अवयवदानाच्या चळवळीला सुरुवात झाली.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : औरंगाबाद विभागात म्हणजे मराठवाड्यात तब्बल ३४२ जण मूत्रपिंड, यकृत मिळण्याच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांचे सर्वाधिक प्रमाण आहे. मात्र, तुलनेत अवयवदानाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अवयवदानाविषयी जनजागृती केली जाते. परंतु रुग्णालयांकडून ब्रेनडेड जाहीर होत नसल्याने अवयवदानाचे प्रमाण कमी होत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली.
औरंगाबादेत १५ जानेवारी २०१६ रोजी पहिले अवयवदान झाले आणि मराठवाड्यात अवयवदानाच्या चळवळीला सुरुवात झाली. वर्षभरानंतर फेब्रुवारी २०१७ मध्ये पहिले हृदय प्रत्यारोपण आणि २५ नोव्हेंबर २०१७ रोजी पहिले यकृत प्रत्यारोपण झाले. मराठवाड्यात २०१६ पासून ते २०१९ या कालावधीत २५ ब्रेनडेड रुग्णांचे अवयवदान झाले आहे. त्यातून अनेकांना नवीन आयुष्य मिळाले. परंतु अवयवदानाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याची चिंता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
फिजिशियन असोसिएशन आॅफ औरंगाबाद, औरंगाबाद सर्जिकल सोसायटीतर्फे शहरात गत आठवड्यात एका सायंटिफिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तज्ज्ञांनी अवयवदानाच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली होती. सांगली येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शहाजी देशमुख यांनी केवळ अवयवदानाची जनजागृती करून थांबता कामा नये, तर ब्रेनडेड म्हणजे काय? लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे म्हटले. राज्यात यकृत प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या जवळपास १ हजार असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात ही संख्या यापेक्षा पाचपटीने अधिक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले. यात मराठवाड्यातही अनेक रुग्णांना यकृताची प्रतीक्षा आहे.
सर्वसामान्य नागरिकांबरोबर अवयवदान वाढण्यासाठी रुग्णालयांमध्येही जनजागृती करण्याची गरज आहे. कारण अनेक रुग्णालये ब्रेनडेड रुग्ण जाहीरच करीत नाहीत. त्यामुळे नातेवाईकांना अवयवदानासाठी प्रेरित करता येत नाही, असे तज्ज्ञांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
५ महिन्यांत २७६ वरून २९३ वर ‘वेटिंग’
मराठवाड्यात आॅगस्ट महिन्यात २७६ रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत होते. ही संख्या आता २९३ वर गेली आहे. याबरोबरच ४९ रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता आहे. अवयवदानाचे प्रमाण कमी असल्याने अवयवांसाठी गरजू रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
रुग्णालयांना पत्र पाठविणार
अपघातांसह अनेक कारणांनी रुग्ण ब्रेनडेड होण्याचे प्रमाण अधिक आहे. परंतु रुग्णालयांकडून ब्रेनडेड जाहीर केले जात नसल्याचे दिसते. त्यामुळे ब्रेनडेड जाहीर करण्यासंदर्भात रुग्णालयांना पत्र पाठविले जाणार आहे.
- डॉ. सुधीर कुलकर्णी, अध्यक्ष, झेडटीसीसी
अवयवदानाचे प्रमाण
वर्ष अवयवदान
२०१६ - ९
२०१७ - ६
२०१८ - ७
२०१९ - ३
एकूण - २५
............................