अवयव प्रत्यारोपण फक्त खासगीतच, घाटी रुग्णालयात का नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:02 AM2021-08-13T04:02:57+5:302021-08-13T04:02:57+5:30

संतोष हिरेमठ औरंगाबाद : महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत सर्वात पहिल्यांदा ब्रेन डेड रुग्णाचे अवयवदान करण्याचा बहुमान ५ वर्षांपूर्वी ...

Organ transplantation is only in private, why not in Valley Hospital? | अवयव प्रत्यारोपण फक्त खासगीतच, घाटी रुग्णालयात का नाही ?

अवयव प्रत्यारोपण फक्त खासगीतच, घाटी रुग्णालयात का नाही ?

googlenewsNext

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत सर्वात पहिल्यांदा ब्रेन डेड रुग्णाचे अवयवदान करण्याचा बहुमान ५ वर्षांपूर्वी औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (घाटी) पटकाविला. मात्र, आजघडीला घाटी रुग्णालयाला अवयवदानाचा विसर पडला आहे. कारण ऑर्गन रिट्रायव्हल सेंटरच्या परवानगीच्या नूतनीकरणाकडेच दुर्लक्ष करण्यात आले आहे. तर दुसरीकडे अवयव प्रत्यारोपण फक्त खासगी रुग्णालयात होत आहे. घाटी रुग्णालयात प्रत्यारोपण का सुरू केले जात नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

दरवर्षी १३ ऑगस्ट हा दिवस जागतिक अवयवदान दिन म्हणून पाळण्यात येतो. मराठवाड्यात औरंगाबादेत १५ जानेवारी २०१६ रोजी पहिले अवयवदान झाले. त्यानंतर संपूर्ण मराठवाड्यात अवयवदानाच्या चळवळीला सुरुवात झाली. या पहिल्या अवयवदानानंतर ४१ व्या दिवशी घाटीत अवयवदान झाले होते. वैजापूर येथील एका २७ वर्षीय ब्रेनडेड रुग्णाचे हृदय चैन्नई, यकृत पुण्याला तर दोन्ही किडन्या शहरातील रुग्णालयातील रुग्णास देण्यात आल्या. औरंगाबादेत फेब्रुवारी २०१७ मध्ये पहिले हृदय प्रत्यारोपण झाले. याच महिन्यात घाटीत दुसऱ्यांदा अवयवदान झाले. त्यामुळे अवयवदानात घाटीही कुठेही मागे नाही, हे दिसले. मात्र, प्रत्यारोपणही घाटीत होईल, यासाठी मात्र, प्रयत्न होताना दिसत नाही.

कोरोनामुळे अवयवदानाला ब्रेक

मराठवाड्यात २०१६ पासून ते २०१९ या कालावधीत २५ ब्रेनडेड रुग्णांचे अवयवदान झाले आहे. त्यातून अनेकांना नवीन आयुष्य मिळाले; परंतु कोरोनामुळे अवयवदानाला खीळ बसली. दीड वर्ष उलटूनही आतापर्यंत एकही अवयवदान झालेले नाही.

६ अत्याधुनिक शस्त्रक्रियागृहे

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात बांधण्यात आलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात एकूण ६ मोडेलर शस्त्रक्रियागृहे आहेत. येथे अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध झालेली आहे. या ठिकाणी युराेलाॅजी, नेफ्राॅलाॅजी, न्यूराॅलाॅजी, कार्डियाेलाॅजी, निओनॅटाॅलाॅजी, बर्न-प्लास्टिक सर्जरी आदी सुपर स्पेशालिटी उपचार देण्याचे नियाेजन आहे. मनुष्यबळाची प्रतीक्षा करावी लागत आहे. याठिकाणी प्रत्यारोपण शक्य असल्याचे मत घाटीतील तज्ज्ञांनी व्यक्त केले. रिट्रायव्हल सेंटरच्या परवानगीच्या नूतनीकरणासंदर्भात माहिती घेतली जाईल, असे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. काशिनाथ चौधरी यांनी सांगितले.

अवयवदान वाढीसाठी बैठक

घाटी रुग्णालयात रिट्रायव्हल सेंटर म्हणून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, घाटी प्रशासनाने या परवानगीचे नूतनीकरण केलेले नाही. त्यासंदर्भात त्यांना स्मरण करून देण्यात आले आहे. अवयवदान वाढीसाठी काही दिवसांपूर्वीच बैठक घेतली आहे.

- डाॅ. सुधीर कुलकर्णी, अध्यक्ष, झेडटीसीसी

-----

अवयवदानाचे प्रमाण

वर्ष ---- अवयवदान

२०१६ ------ ९

२०१७ ------ ६

२०१८ ------ ७

२०१९ ------ ३

२०२० ------ ०

२०२१ ------ ०

एकूण ------ २५

Web Title: Organ transplantation is only in private, why not in Valley Hospital?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.