जैन समाजातर्फे अभय महोत्सवाचे आयोजन
By Admin | Published: June 2, 2016 11:29 PM2016-06-02T23:29:10+5:302016-06-02T23:48:31+5:30
औरंगाबाद : गुरू रामजन्म शताब्दी वर्षानिमित्त शहरात अभय महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
औरंगाबाद : गुरू रामजन्म शताब्दी वर्षानिमित्त शहरात अभय महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त गच्छाधिपती आचार्य विजय अभयदेव सुरिश्वरजी महाराज यांचे ५ जून रोजी शहरात आगमन होत आहे. १५ दिवसीय या महोत्सवात महाराजांचे प्रवचन, धार्मिक कार्यक्रम व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती सकल जैन समाजाचे कार्याध्यक्ष व अभय महोत्सवाचे अध्यक्ष, आ.सुभाष झांबड यांनी दिली.
यानिमित्ताने जोहरीवाडा येथे अरिहंत भवन येथे आयोजित पत्रपरिषदेत आ.झांबड यांनी सांगितले की, गुरू रामजन्म शताब्दी वर्षानिमित्त धर्मजागरण, विश्वशांती, संघशांती, मानवता धर्म संदेश समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने अभय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ५ जून रोजी सकाळी ६.३० वाजता आचार्य विजय अभयदेव सुरिश्वरजी महाराज यांचे आगमन होणार आहे. महावीर चौक येथील महावीर स्तंभ येथून स्वागतयात्रा निघणार आहे. कर्णपुरा येथील मुनिसुव्रत जैन मंदिर येथे स्वागतयात्रा पोहोचणार आहे. आचार्यश्रींसह पन्यास मोक्षरत्नविजयजी म. सा., साध्वी प्रज्ञाश्रीजी म. सा., पद्मरेखाश्रीजी म. सा. असे १७ साधू-साध्वींजी यांचे शहरात आगमन होत आहे. यानंतर प्रवचन व १० वाजता घंटाकर्ण महावीर पूजन करण्यात येणार आहे. ६ जून रोजी ज्येष्ठ मासानिमित्त महामांगलिकाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारंभी सकाळी ६.३० वाजता मुनिसुव्रत जैन मंदिर येथे स्नात्र महोत्सव अनुष्ठान होणार आहे. सकल विश्वशांतीसाठी आचार्य विजय अभयदेव सुरिश्वरजी महाराज व पंन्यास मोक्षरत्नविजयजी म. सा. महामांगलिक देणार आहेत. यासाठी देश-विदेशातून दीड ते दोन हजार भाविक शहरात येणार आहेत. ८ जून रोजी जोहरीवाडा येथील गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिरात सकाळी आचार्यश्रींचे आगमन व प्रवचन होणार आहे.
१० रोजी आचार्यश्रींच्या आचार्यपदाच्या ३२ वे वर्षप्रवेश व पंन्यासजी मोक्षरत्नजी म. सा. यांच्या पंन्यासपदनिमित्त महावीर भवन येथे सकल जैन महिला मंडळातर्फे मंगलगीताचा कार्यक्रम होईल. ११ रोजी जाधवमंडी येथील विमलनाथ जैन श्वेतांबर मंदिरात आचार्यश्रींचे प्रवचन होणार आहे. १२ रोजी पानदरिबा रोडवरील अग्रसेन भवन येथे सकाळी ९ वाजता आचार्यश्रींचे प्रवचन व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत केली जाईल. या कार्यक्रमांचे आयोजन आनंदजी- कल्याणजी जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट तसेच भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती आणि सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. पत्रपरिषदेत महावीर पाटणी, रतिलाल मुगदिया, संपतराज देवडा, कनकमल सुराणा, जव्हेरचंद डोसी, डॉ. प्रकाश झांबड, संजय संचेती उपस्थित होते.
१४ रोजी आचार्यश्रींचे सिडको एन-३ येथील शंखेश्वर पार्श्वनाथ जैन जिनालयात आगमन होत आहे. केशरबाग मंगल कार्यालय येथे मांगलिक प्रवचन होणार आहे. १६ जूनपर्यंत आचार्यश्रींचे प्रवचन केशरबाग मंगल कार्यालयातच होणार आहे.
१७ रोजी उल्कानगरीतील वर्धमान रेसिडेन्सी येथील संभवनाथ जैन मंदिर येथे प्रवचन होणार आहे. १८ रोजी आचार्यश्रींचे पुणे येथील चातुर्मासाकरिता तीसगावकडे प्रस्थान होणार आहे.