जैन डॉक्टरांच्या पहिल्या जागतिक अधिवेशनाचे श्रवणबेळगोळ येथे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:06 AM2018-03-06T01:06:21+5:302018-03-06T01:06:26+5:30
बाहुबली भगवंतांच्या ८८ व्या महामस्तकाभिषेक सोहळ्यानिमित्ताने देश-परदेशातील डॉक्टरांचे अधिवेशन १० ते १२ मार्चदरम्यान श्रवणबेळगोळ येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती अधिवेशनाचे संयोजक अध्यक्ष डॉ. सन्मती ठोले यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बाहुबली भगवंतांच्या ८८ व्या महामस्तकाभिषेक सोहळ्यानिमित्ताने देश-परदेशातील डॉक्टरांचे अधिवेशन १० ते १२ मार्चदरम्यान श्रवणबेळगोळ येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती अधिवेशनाचे संयोजक अध्यक्ष डॉ. सन्मती ठोले यांनी दिली.
या अधिवेशनात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ नि:शुल्क सेवा देणार आहेत. या अनुषंगाने श्रवणबेळगोळ येथील समस्त ग्रामस्थांसाठी मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन बाहुबली सामान्य रुग्णालयात करण्यात येणार आहे. यासाठी डॉ. अक्षय ठोळे व ऊर्वशी जैन यांच्यातर्फे अडीच लाखांच्या औषधी मोफत उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
अधिवेशनाच्या उद््घाटनप्रसंगी प. पू. मुनी १०८ चिन्मयसागरजी महाराज यांच्या मंगल सान्निध्यात व प. पू. जगतगुरू स्वस्तिश्री चारुकीर्ती महास्वामी यांच्या मार्गदर्शनात होणार आहे. ११ मार्च रोजी महामस्तकाभिषेकानंतर देशातील नामांकित तज्ज्ञांना सन्मानित करण्यात येणार आहे. देश व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संशोधन कार्य, समाजोपयोगी कार्य, धर्म संरक्षण हेतू कार्य केलेले आहे, अशा चिकित्सकास बाहुबली पुरस्कार, चिन्मय चिकित्सारत्न पुरस्कार, चिन्मय चिकित्सा सुवर्ण पुरस्कार, चिन्मय चिकित्सा रजत पुरस्काराने सन्मानित केले जाईल, असे चिन्मयसागर चॅरिटेबल ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश मोदी यांनी कळविले आहे. तसेच या पुरस्कारांत जे चिकित्सक संयममार्गावर अगे्रसर आहेत, त्यांना जैनाचार्य संत शिरोमणी १०८ श्री.विद्यासागर महाराज यांच्या संयम सुवर्ण महोत्सवानिमित्ताने संयम सुवर्ण महोत्सव पुरस्काराने सन्मानित केले जाईल. या अधिवेशनात देशातील नामांकित तज्ज्ञांद्वारे ‘जैन जीवन पद्धत सर्व मानव जीवनास उपयोगी कशी आहे’ या विषयावर चर्चा होणार आहे. या अधिवेशनाचे संयोजक प्रख्यात मज्जारोगतज्ज्ञ डॉ. डी. सी. जैन ( नवी दिल्ली) व विलासपूरचे डॉ. अरहतशरण जैन राहतील. या अधिवेशनाच्या वेबसाईटचे विमोचनदेखील झाले. अधिवेशनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.