प्रलंबित मागण्यांसाठी 'उपेक्षित मराठा मशाल जागृती यात्रे'चे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 07:34 PM2020-11-24T19:34:22+5:302020-11-24T19:37:02+5:30
प्रलंबित मागण्या मान्य करून समाजाला न्याय आणि हक्क मिळवून द्यावा
औरंगाबाद : मराठा आरक्षण आणि समाजाच्या अन्य प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यातर्फे २८ नोव्हेंबर पासून ''उपेक्षित मराठा मशाल जागृती यात्रेचे'' आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
क्रांतीचौक येथून शनिवारी सकाळी ११ वाजता या यात्रेला प्रारंभ होईल. ही यात्रा कायगाव- कोपर्डी (जिल्हा. अहमदनगर) मार्गे २९ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी असलेल्या वढू बुद्रुक येथे अभिवादन करण्यासाठी पोहोचेल. शिवनेरी येथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी शिवनेरी ते आझाद मैदान पदयात्रेस सुरुवात होईल. कोरोनामुळे पदयात्रेत केवळ ५० व्यक्तींचा सहभाग असेल, असे केरे यांनी सांगितले.
७ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे यात्रा दाखल होईल. उपेक्षित मराठ्याच्या प्रलंबित मागण्या मान्य करून समाजाला न्याय आणि हक्क मिळवून द्यावा, याकरिता मुख्यमंत्र्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भेट देणार असल्याचे केरे यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेसाठी किरण काळे पाटील, राहुल पाटील, मनोज मुरदारे, मोती वाघ, कृष्णा उघडे, नरहरी उबाळे आदी उपस्थित होते.