शिवजयंती महोत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:02 AM2021-02-13T04:02:01+5:302021-02-13T04:02:01+5:30
औरंगाबाद : शिवजयंतीनिमित्त औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने कोरोनाचे सर्व नियम पाळून व आरोग्याचा संकल्प करून विविध कार्यक्रमांचे ...
औरंगाबाद : शिवजयंतीनिमित्त औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने कोरोनाचे सर्व नियम पाळून व आरोग्याचा संकल्प करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार व अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिली.
१६ फेब्रुवारीपर्यंत शहरातील विविध शाळांमध्ये निबंध, चित्रकला, वेशभूषा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येतील. विजेत्यांना १७ व १८ फेब्रुवारी रोजी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करून अभिवादन करण्यात येईल.
१६ फेब्रुवारी रोजी वेरूळ येथील मालोजीराजे गढी परिसरात स्वच्छता अभियान राबवून ध्वजारोहण करण्यात येईल व छत्रपती शहाजी महाराजांना अभिवादन करण्यात येईल. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात येईल व ध्वजारोहण करून अभिवादन करण्यात येईल. वाळुजरोड, पडेगाव रोड, जालना रोड, पैठणरोडवर यावर्षी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची जवाबदारी घेण्यात येणार आहे, असे संयोजक अनिल मानकापे पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस मनोज पाटील, राजेश पवार, संतोष कावळे पाटील, अनिल बोरसे, लक्ष्मीनारायण राठी, संदीप पाटील, डी. एन. पाटील, अभिजित देशमुख आदींची उपस्थिती होती.
................
पुतळ्यासाठी महापालिकेस वारंवार निवेदने दिली
क्रांतिचौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम चालूच आहे. ते वेळेच्या आत पूर्ण व्हावे यासाठी औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने महापालिकेस वारंवार निवेदने देण्यात आली. परंतु त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे दिसून येते, अशी खंत पृथ्वीराज पवार यांनी व्यक्त केली.
.................
जगन्नाथ काळे म्हणाले की, कोरोना कमी होत असल्यामुळे शिवजयंती उत्साहात साजरी करावयाची होती. परंतु शासनाने कडक निर्बंध घातल्यामुळे आठ दिवसांपूर्वीच ठरविल्यानुसार शिवजयंतीची मिरवणूक काढायची की नाही हे आता सर्वांशी चर्चा करून ठरवावे लागेल. पोलिसांची परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.