पोटच्या मुलांसारखे जपले जाते अनाथ बाळांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:04 AM2021-04-16T04:04:51+5:302021-04-16T04:04:51+5:30
औरंगाबाद : लहान मुलं, बाळामध्ये कोरोना वाढत आहे. बाळांना आई-वडील जीवापाड जपत आहेत. एखादी शिंक आली किंवा ताप आला ...
औरंगाबाद : लहान मुलं, बाळामध्ये कोरोना वाढत आहे. बाळांना आई-वडील जीवापाड जपत आहेत. एखादी शिंक आली किंवा ताप आला की, लगेच डॉक्टरकडे नेले जाते. मात्र, आई-वडील जिवंत असतानाही ज्या चिमुकल्यावर अनाथचा ठपका लागला त्या बाळाचे काय हाल असतील या विचाराने हृदय हळहळते. मात्र, अनाथालयात बाळाची काळजी पोटच्या मुलापेक्षा जास्त घेतली जात आहे. यामुळे मागील वर्षभरात १७ अनाथ बाळांना कोरोनापासून दूर ठेवण्यात भारतीय समाज सेवा केंद्राला यश आले आहे.
घरात एक बाळ सांभाळताना त्याची देखभाल करताना संपूर्ण कुटुंबाला तारेवरची कसरत करावी लागते. मात्र, अनाथालयात एकाच वेळी अनेक बाळांना कसे सांभाळले जात असेल तेही या कोरोना काळात असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
भारतीय समाज सेवा केंद्रात आजघडीला ० ते ६ वर्ष वयोगटातील १७ अनाथ बाळे आहेत. त्यात ५ मुली तर १२ मुलांचा समावेश आहे. बाळांना कोरोना संसर्गापासून कसे जपायचे हा संस्थेसमोर यक्ष प्रश्न होता. मात्र, बाल कल्याण मंडळाची मार्गदर्शक तत्त्वे व संस्थेने डॉक्टरची चर्चा करून ठरवून दिलेल्या नियमांचे कठोरपणे पालन करणे सुरू करण्यात आले. केंद्रात बाळाच्या सुरक्षेला सर्वात पहिले प्राधान्य देत असल्याने बाहेरून संस्थेत कामानिमित्त भेट देण्यासाठी येणाऱ्या लोकांना संस्थेत येण्यास मनाई करण्यात आली आहे. मुख्य दरवाजावरच सुरक्षारक्षक बसविण्यात आला आहे. देणगी देणाऱ्यांनाही कंपाऊंडमध्येच बसविले जाते. बाळांच्या खोलीत त्यांची देखभाल करणाऱ्या आया व डॉक्टर यांनाच प्रवेश दिला जात आहे. अन्य कर्मचाऱ्यांनाही तिथे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. आया घरून संस्थेत आल्यानंतर त्यांना संपूर्ण सॅनिटायझरचा स्प्रे मारला जातो. त्यानंतर त्यांना संस्थेमधील कपडे परिधान करून बाळाच्या खोलीत पाठवले जाते. डॉक्टर तपासणीला येतात तेही दवाखान्यात जाण्याआधी या केंद्रात येऊन बाळांना तपासून मगच त्यांच्या दवाखान्यात जातात. अन्य कर्मचाऱ्यांनाही संपूर्ण सॅनिटायझरचा स्प्रे मारला जातो. बायोमेट्रिक करतानाही सॅनिटायझरचा वापर केला जातो. हँडवाश केले जाते. एवढेच नव्हे तर दिवसातून ४ ते ५ वेळेस संपूर्ण फारशी, खोल्या निर्जंतुकीकरण केले जाते. बालकल्याण मंडळाच्या अधिकारीही सतत या बाळांच्या आरोग्यावर लक्ष ठेऊन आहेत. यामुळे वर्षभरात एकही बाळ पॉझिटिव्ह आले नाही, असे संचालिका वसुधा जातेगावकर यांनी सांगितले.
मागील वर्षभरात सॅनिटायझर, निर्जंतुकीकरणासाठी जंतुनाशके, हँडवाश, पाण्याचे टँकर हा २५ टक्के खर्च वाढला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
चौकट
५ महिने आया राहिल्या संस्थेत
मागील वर्षी लॉकडाऊन सुरू झाले तेव्हा या मुलांचे हाल होऊ नये म्हणून त्यांची देखभाल करणाऱ्या १७ आयांना संस्थेमध्येच ठेवून घेतले होते. त्यांच्या राहण्याची, झोपण्याची, जेवणाची सर्व व्यवस्था संस्थेत करण्यात आली हॊती. या आया ५ महिने आपल्या घरी गेल्याच नाहीत. त्यानंतर त्या आपल्या कुटुंबाला भेटल्या. आता संचारबंदी असली तरी वाहने सुरू असल्याने आया घरी ये-जा करू शकत आहेत.
चौकट
४५च्या आतील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला परवानगी द्यावी
वसुधा जातेगावकर यांनी सांगितले की, केंद्रातील सर्व आया, अन्य कर्मचारी यांना लसीकरण करण्यात येत आहे. ज्या ४५च्यावरती महिला आहे, त्यांचे लसीकरण झाले. पण ४५च्या आतील महिला कर्मचाऱ्यांनाही महानगरपालिकाने लसीकरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.