माताबाल संगाेपनात उस्मानाबाद राज्यात अव्वल; औरंगाबाद पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2021 07:29 PM2021-11-09T19:29:03+5:302021-11-09T19:36:07+5:30

मूल्यमापन अहवाल प्रसिद्ध झाला असून जिल्ह्याला १०० पैकी ८३ गुण मिळाले आहेत

Osmanabad tops state in parental care | माताबाल संगाेपनात उस्मानाबाद राज्यात अव्वल; औरंगाबाद पिछाडीवर

माताबाल संगाेपनात उस्मानाबाद राज्यात अव्वल; औरंगाबाद पिछाडीवर

googlenewsNext

उस्मानाबाद : माताबाल संगाेपन आणि लसीकरणाचे जिल्हानिहाय मूल्यमापन राज्य शासनाच्या आराेग्य विभागाकडून करण्यात आले आहे. त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्याने १०० पैकी ८३ गुण घेत रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकाविले आहे. तर दुसरीकडे शेजारील पुढारलेल्या लातूरसह बीड, हिंगाेली, साेलापूर, जालना हे जिल्हे पिछाडीवर गेले आहेत.

माता तसेच बालकांचे आराेग्य सुदृढ रहावे, यासाठी जिल्हा आराेग्य विभागाकडून विविध उपाययाेजना राबविल्या जातात. साेबतच नियमित लसीकरणही केले जाते. काेराेना संकट काळात अनेक जिल्ह्यांचा या उपक्रमांकडे कानाडाेळा झाला; परंतु जिल्हा परिषद आराेग्य विभागाकडून नाॅन काेविड उपक्रमही तितक्याच ताकदीने राबविले. आवश्यक दक्षता घेऊन कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्राथमिक आराेग्य केंद्र, उपकेंद्रांच्या ठिकाणी कॅॅॅम्प घेण्यात आले. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच उपक्रम गतिमान राहिले. दरम्यान, शासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांची सप्टेंबर २०२१ अखेर कशा पद्धतीने अंमलबजावणी झाली, याचे सरकारकडून मूल्यमापन करण्यात आले. हा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्याने अव्वलस्थान प्राप्त केले आहे. १०० पैकी ८३ गुण घेतले आहेत. दुसऱ्या स्थानावर भंडारा व गडचिराेली हे जिल्हे आहेत. त्यांना प्रत्येकी ८२ गुण मिळाले आहेत. या दाेन्ही जिल्ह्यांचे रँकिंग २-३ एवढे आहे. तिसऱ्या स्थानावर बुलडाणा हा जिल्हा आहे. ८० गुण मिळाल्याने चाैथ्या रँकिंगमध्ये समावेश झाला आहे. परिणामी मराठवाड्यातील एकही जिल्हा पहिल्या तीनमध्ये येऊ शकला नाही. हिंगाेली, लातूर, बीड या जिल्ह्यांना प्रत्येकी ७५ गुण मिळाले. यांचे रँकिंग १०-१३ एवढे आहे. परभणी जिल्ह्यास १८-२० तर नांदेडच्या २२-२३ या रँकिंगमध्ये समावेश झाला आहे. एकूणच शिक्षण, आराेग्य तसेच अन्य घटकांमध्ये पुढारलेल्या जिल्ह्यांचे माताबाल संगाेपनाचे प्रगतीपुस्तक निराशाजनकच मानले जात आहे. याबद्दल सीईओ राहुल गुप्ता, जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. नितीन बाेडके, जिल्हा प्रजनन व बाल आराेग्य अधिकारी डाॅ. कुलदीप मिटकरी आदींनी डाॅक्टर, कर्मचाऱ्यांचे काैतुक केले.

औरंगाबाद, जालना पिछाडीवर...
औद्याेगिकीकरणात पुढारलेल्या औरंगाबाद तसेच साेलापूर जिल्ह्यांची माताबाल संगोपन आणि नियमित लसीकरणाकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे राज्य सरकारने केलेल्या मूल्यमापनातील रँकिंगवरून स्पष्ट हाेते. मराठवाड्यातील आठ पैकी औरंगाबाद जिल्हा तळाला आहे. शंभरपैकी केवळ ६१ गुण मिळाले आहेत. रँकिंग २९-३१ एवढी आहे. जालन्याची स्थितीही समाधानकारक नाही. अवघे ६५ गुण मिळाले असून रँकिंग २४ एवढी आहे, हे विशेष.

जिल्ह्यात काेविडचा संसर्ग प्रचंड वाढला असतानाही जिल्हा आराेग्य यंत्रणेने माताबाल संगाेपन आणि नियमित लसीकरणाकडे डाेळेझाक हाेऊ दिली नाही.जिल्हा आराेग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आराेग्य अधिकारी, सर्व डाॅक्टर, आराेग्यसेविका, आराेग्य सहायक तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे उस्मानाबाद राज्यात अव्वल ठरले. हे स्थान कायम ठेवण्यासाठी यापुढेही तेवढ्याच ताकदीने प्रयत्न सुरू ठेवू.
- राहुल गुप्ता, सीईओ, जिल्हा परिषद.

Web Title: Osmanabad tops state in parental care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.