‘त्या’ भामट्यांकडून आणखी गुन्हे उघड
By Admin | Published: February 17, 2016 11:49 PM2016-02-17T23:49:12+5:302016-02-18T00:06:39+5:30
औरंगाबाद : महाराष्ट्रासह विविध राज्यांत हातचलाखी करून प्रवाशांना लुटणाऱ्या दिल्लीच्या भामट्यांना गुन्हे शाखा पोलिसांनी ११ फेब्रुवारी रोजी अटक केली होती.
औरंगाबाद : महाराष्ट्रासह विविध राज्यांत हातचलाखी करून प्रवाशांना लुटणाऱ्या दिल्लीच्या भामट्यांना गुन्हे शाखा पोलिसांनी ११ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्यांच्यासोबत औरंगाबादच्या दोन रिक्षाचालकांच्याही मुसक्या आवळल्या होत्या. या भामट्यांकडून आणखी तीन गुन्हे उघडकीस आले असून आतापर्यंत त्यांच्याकडून एक लाख ८४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मोहंमद इजहार ऊर्फ लाला मोहंमद इर्शाद (३५, रा. बडीगनी, बिजनोर, उत्तर प्रदेश, सध्या दिल्ली), दिलशाद अहमद अब्दुल गनी (३०, रा. मधुसूधनपूर हाफीज, बिजनोर, उत्तर प्रदेश, सध्या दिल्ली) या दोघांसह औरंगाबादेतील रिक्षाचालक शेख हनीफ शेख मोईनोद्दीन (रा. बुढीलेन, कबाडीपुरा) व शेख हारुण शेख मोईनोद्दीन (रा. मिसारवाडी) अशी अटकेतील भामट्यांची नावे आहेत. हे दिल्लीकर भामटे औरंगाबादच्या या दोन्ही रिक्षाचालकांच्या मदतीने शहरात प्रवाशांना लुटण्याचे गुन्हे करीत असल्याची ‘खबर’होती. त्या आधारे गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, फौजदार अनिल वाघ, सहायक फौजदार आरेफ शेख, नितीन मोरे, जमादार भीमराव आरके, मनोज चव्हाण, संजय खोसरे, संतोष सूर्यवंशी व मुक्तेश्वर लाड यांनी बुधवारी पंचवटी हॉटेलजवळ त्या चौघांच्या मुसक्या आवळल्या होत्या.
सोलापूरहून आलेल्या सिद्धेश्वर बिराजदार यांच्या बॅगमधील ५० हजार रुपये काढून घेतल्याची कबुली त्यांनी दिली होती. या गुन्ह्यात क्रांतीचौक पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या भामट्यांकडून चालू वर्षातील क्रांतीचौक ठाण्यात दाखल झालेले दोन आणि २०१५ मध्ये एमआयडीसी सिडको ठाण्यात दाखल झालेला एक असे आणखी तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
या भामट्यांना बॅगमध्ये पैसे आहेत की नाही, हे ओळखण्याची आणि बॅगचे कुलूप तात्काळ उघडण्याची कला अवगत असल्याचे पोलिसांनी सांगितले.