मेहदीला पळविण्याचा कट;आणखी दोघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:36 AM2018-08-31T00:36:55+5:302018-08-31T00:37:53+5:30
सुपारी किलर इम्रान मेहदी याला पळवून नेण्याच्या कटातील आणखी दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हर्सूल ते कडेठाण रस्त्यावर पकडले. आरोपींकडून एक पिस्टल आणि १० काडतुसे जप्त केली. अटकेतील आरोपींपैकी एक उत्तर प्रदेशातील रहिवासी असून, त्याच्याविरोधात खुनाचे दोन गुन्हे नोंद आहेत. दुसरा रिक्षाचालक असून, तो सतत आरोपींच्या संपर्कात असतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सुपारी किलर इम्रान मेहदी याला पळवून नेण्याच्या कटातील आणखी दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हर्सूल ते कडेठाण रस्त्यावर पकडले. आरोपींकडून एक पिस्टल आणि १० काडतुसे जप्त केली. अटकेतील आरोपींपैकी एक उत्तर प्रदेशातील रहिवासी असून, त्याच्याविरोधात खुनाचे दोन गुन्हे नोंद आहेत. दुसरा रिक्षाचालक असून, तो सतत आरोपींच्या संपर्कात असतो.
विजयकुमार ऊर्फ आफताब रामप्रसाद चौधरी (३६, रा. बालकेश्वरी, ता. करावली, जि. आग्रा, उत्तर प्रदेश) आणि अबू चाऊस ऊर्फ मुसा सालेह चाऊस (२६, रा. सईदा कॉलनी, जटवाडा रस्ता) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांवर गोळीबार करून इम्रान मेहदीला पळवून नेण्यासाठी मध्यप्रदेशातून आलेल्या शार्पशूटरच्या टोळीसह ११ जणांना २७ आॅगस्ट रोजी सकाळी गुन्हे शाखेने अटक केली. त्यावेळी त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल आणि आठ काडतुसे जप्त केली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. इम्रानला सोडण्यासाठी आलेल्या त्याच्या हस्तकांकडे दोन पिस्टलसह अन्य शस्त्रे असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली होती. यात मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, मुंबई आणि बीड येथील काही जणांचा समावेश असल्याची पक्की खबर होती. काही जण हर्सूल परिसरात रूम भाड्याने घेऊन राहत असल्याची माहिती बुधवारी रात्री निरीक्षक मधुकर सावंत यांना मिळाली. त्यानंतर सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सावंत, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक अनिल वाघ, उपनिरीक्षक अमोल देशमुख, कर्मचारी शिवाजी झिने, सुनील धात्रक, राजेंद्र साळुंके, भगवान शिलोटे, संतोष सूर्यवंशी, शेख नवाब, वीरेश बने, शिवाजी भोसले, संजय जाधव, भरत बहुरे आणि शेख सुलताना यांनी हर्सूल परिसरात आरोपींचा शोध सुरू केला. हर्सूल भागातील कोलठाणवाडी रस्त्यावर रात्री पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. तेव्हा दोन्ही संशयित पोलिसांना दिसले. त्यावेळी पुढे जाऊन पोलिसांनी त्यांचे वाहन वळवून आणले आणि अचानक आरोपींजवळ गाडी उभी करून त्यांना चोहोबाजूने घेरून पकडले.
आफताबने पोलिसांवर पिस्टल रोखण्याचा केला प्रयत्न
यावेळी आफताबला पोलिसांनी पकडताच त्याने कमरेत खोसलेले पिस्टल काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा प्रयत्न हाणून पाडला आणि त्याच्या हातातील पिस्टल हिसकावून घेतला. त्या पिस्टलमध्ये सहा गोळ्या होत्या. तर आरोपी मुसाच्या खिशात चार काडतुसे मिळाली.
आफताब ऊर्फ विजयकुमार चौधरी याने वयाच्या अठराव्या वर्षी आग्रा येथे पहिला खून केला. त्यानंतर तो मुंबईला आला. तेथेही त्याने साथीदाराच्या मदतीने एकाची हत्या केली होती. याप्रकरणी न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. ही शिक्षा भोगत असताना तो नाशिक कारागृहात आणि नंतर औरंगाबादेतील हर्सूल कारागृहात होता. हर्सूल कारागृहात असताना त्याची ओळख आरोपी इम्रान मेहदी आणि सरूफ खानसह अन्य आरोपींसोबत झाली होती. तब्बल साडेसोळा वर्षांनंतर आफताब १९ जुलै रोजी कारागृहातून बाहेर आला. त्याच्या सुटकेसाठी इम्रानने त्याला मदत केल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवाय कारागृहातून सुटल्यानंतर त्याला गावी जाण्यासाठी पैसेही मेहदीने दिले होते, असे सूत्रांनी सांगितले.
इम्रानला सोडविण्यासाठी
आफताब आला आग्य्राहून
आफताब हा इम्रानचा चांगला मित्र झाला होता. इम्रानला सोडवायचे आहे. २७ रोजी त्याला न्यायालयात आणले जाणार आहे. त्याला सोडविण्यासाठी जास्त माणसांची गरज असल्याने तू लगेच ये, असा निरोप त्याला देण्यात आला. २५आॅगस्ट रोजी तो आग्य्राहून रेल्वेने निघाला आणि २६ रोजी दुपारी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर उतरला. त्यावेळी त्याला घेण्यासाठी रेल्वेस्टेशनवर रिक्षाचालक अबू चाऊस ऊर्फ मुसा हा हजर होता. २६ पासून कालरात्री अटक होईपर्यंत आफताबची सर्व व्यवस्था अबू चाऊस पाहत होता. त्याला खर्चासाठी पैसेही त्यानेच पुरविल्याचे सूत्रांनी सांगितले.