...अन्यथा १५ दिवस लॉकडाऊन; विभागीय आयुक्तांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 03:51 PM2020-06-27T15:51:11+5:302020-06-27T15:59:27+5:30
मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सनंतर हालचालींना वेग
औरंगाबाद : प्रशासकीय यंत्रणातील बेबनाव, सुविधांची वानवा आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यातील अनेक अडचणीशिवाय नागरिकांकडून होत असलेले नियमांचे उल्लंघन, यामुळे शहरासह औद्योगिक वसाहतींमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादकरांनी कोरोना नियंत्रणाबाबत नियम पाळले नाहीत, तर आजवर पाहिले नसेल असे लॉकडाऊन १५ दिवस करण्याचा इशारा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शुक्रवारी दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री लोकप्रतिनिधी आणि प्रशासनासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये लॉकडाऊन घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले आहेत. शिवाय कोरोना नियंत्रणाबाबत विभागीय आयुक्त्त केंद्रेकर यांनी सूत्रे हाती घ्यावीत, असे सुचविले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहर आणि औद्योगिक क्षेत्रात कडक लॉकडाऊन करण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू झाला आहे. ५ जूनपासून लॉकडाऊनमध्ये दिलेली शिथिलता कोरोना प्रसारासाठी पोषक ठरली असून, औरंगाबाद पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या वळणावर येऊन ठेपले आहे, अशी प्रशासनाची भावना झाली आहे.
गुरुवारी जिल्ह्यातील विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी सम, विषम पद्धतीने बाजारपेठा सुरू ठेवण्यास विरोध केला. तसेच लॉकडाऊन करण्याची मागणीदेखील केली होती; परंतु यापुढे लॉकडाऊन करण्यात येणार नाही, असे केंद्रेकर यांनी स्पष्ट केले होते. मुख्यमंत्र्यांनीही गुरुवारच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये लॉकडाऊनचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे सूचित केले होते. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त याबाबत एकत्रित निर्णय घेऊ शकतात आणि लॉकडाऊन कडक पाळले जाणार असेल तर निर्णय व्हावा, कागदावरील लॉकडाऊन करण्यात अर्थ नाही. कडक लॉकडाऊन करायचे असेल तरच निर्णय घ्या, असे मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेला बजावले होते. त्या अनुषंगाने कडक लॉकडाऊनच्या हालचालींना वेग आला आहे. आयुक्त केंद्रेकर म्हणाले, रुग्णसंख्या वाढीचा वेग आणि मृत्यूदरात जर काही फरक पडला नाहीतर मोठे लॉकडाऊन करावेच लागणार आहे. लोकांनी ऐकले नाही आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनला आले नाहीत तर लॉकडाऊन करावेच लागेल. वेळप्रसंगी औद्योगिक वसाहतींमध्येदेखील लॉकडाऊन करावेच लागेल. मात्र असा निर्णय घ्यावा लागू नये यासाठी लोकांनी सुधारले पाहिजे, असे ते म्हणाले.
निर्बंध शिथिल केल्याचा गैरफायदा
कोरोनामुळे २२ मार्चपासून बंद असलेला शहराचा गाडा ५ जूनपासून पूर्वपदावर आला खरा, मात्र कोरोनाचे भूत सर्वांच्या मानगुटीवर बसले. सम-विषम पद्धतीने बाजारपेठा सुरू केल्या, त्याचा पूर्णत: फज्जा उडाला. कुठल्याही शिस्तीचे, नियमांचे पालन न करता नागरिक बाहेर पडत आहेत. राज्य शासनाने पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊनचे रूप कसे असेल, हे जाहीर करताना काही अटी शिथिल तर काही निर्बंध घातले होते. त्याचे कुठेही पालन झाले नाही.
नवी मुंबईप्रमाणे होऊ शकतो निर्णय
नवी मुंबईमध्ये लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढली. त्यामुळे तिथे दहा कंटेन्मेंट झोन जाहीर करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. या कंटेन्मेंट झोनमध्ये २९ जून ते ५ जुलैपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे काही प्रमाणात कोरोनाला अटकाव करण्यात यश मिळेल, असे तेथील प्रशासनाला वाटत आहे. याच धर्तीवर औरंगाबादमध्ये काही दिवस संपूर्ण लॉकडाऊन राबविता येईल का, याची चाचपणी प्रशासनातर्फे होत आहे.
वाळूजसाठी स्वतंत्र अधिकारी
वाळूज परिसरात रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे, सहायक आयुक्त शिवाजी शिंदे यांची नियुक्ती केली आहे.