...अन्यथा कंटेनरच्या आगीत आलिशान कार झाल्या असत्या भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 04:39 PM2018-11-02T16:39:45+5:302018-11-02T16:40:56+5:30
अग्निशमन दलाने तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवले आणि कंटेनरमधील नामांकित कंपन्याच्या आठ आलिशान कार सुरक्षित राहिल्या.
औरंगाबाद : सातारा परिसरातील बीड बायपासवर गुरुवारी पहाटे एका कंटेनरला अचानक आग लागली. अग्निशमन दलाने तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवले आणि कंटेनरमधील नामांकित कंपन्याच्या आठ आलिशान कार सुरक्षित राहिल्या.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी (दि.१ ) पहाटे शहरातील एका नामांकित चारचाकी कंपनीमधून आठ अलिशान गाड्या एक कंटेनर अहमदाबादकडे नेत होते. पहाटे ५ वाजून २५ मिनिटांनी कंटेनर बीडबायपास वर आले असता त्याचे उजव्या बाजूचे एक टायर फुटले. यामुळे चालक कंटेनर थांबवून मागील बाजूस पाहणी करण्यासाठी उतरला. याच दरम्यान कंटेनरच्या कॅबीनमध्ये अचानक स्पार्किंग झाली आणि तिथे आग लागली. क्षणार्धात संपूर्ण कॅबीन आगीच्या विळख्यात आली.
चालकाने तत्काळ अग्निशमन दलाला संपर्क केला. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले, तोपर्यंत आग कॅबीनपासून मागील कंटेनरकडे पसरली होती. यानंतर अग्निशमन दलाने अर्ध्यातासाच्या अथक मेहनतीने आगीवर नियंत्रण मिळवले. हे कंटेनर शहरात असणाऱ्या नामांकित कंपनीच्या आठ गाड्या अहमदाबादकडे नेत होते. अग्निशमन दलाने तत्परतेने आग विझवली अन्यथा या आलिशान गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या असत्या. यामुळे लाखोंचे नुकसान टळले.
घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांनी पोलीस कॉन्स्टेबल शेषराव चव्हाण व त्यांच्या टीमला घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास शेषराव चव्हाण हे करत आहेत