...त्यापेक्षा मीच राजीनामा देतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:19 AM2017-09-07T01:19:13+5:302017-09-07T01:19:13+5:30
संतप्त झालेल्या कुलगुरूंनी निलंबित करता येत नाही, पुरावा नसताना निलंबन कसे करता येईल, उद्या मलाच तोंड द्यावे लागेल, त्यापेक्षा मीच राजीनामा देतो, असे उद्गार काढल्यामुळे सर्वच कार्यकर्ते आवाक् झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इंग्रजी विभागात एका विद्यार्थ्याला प्रवेश नाकारल्यामुळे विद्यार्थी संघटनांचे सहा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्यांनी बुधवारी कुलगुरूंशी संवाद साधला. कार्यकर्ते इंग्रजी विभागप्रमुखांच्या निलंबनासाठी अडून होते. तेव्हा संतप्त झालेल्या कुलगुरूंनी निलंबित करता येत नाही, पुरावा नसताना निलंबन कसे करता येईल, उद्या मलाच तोंड द्यावे लागेल, त्यापेक्षा मीच राजीनामा देतो, असे उद्गार काढल्यामुळे सर्वच कार्यकर्ते आवाक् झाले.
विद्यापीठातील इंग्रजी विभागात प्रकाश पट्टेकर या विद्यार्थ्याला प्रवेशाचे पत्र दिल्यानंतर प्रवेश नाकारत जातिवाचक उल्लेख केल्याची तक्रार कुलगुरूंकडे करण्यात आली होती. तसेच याप्रकरणी विभागप्रमुख डॉ. गीता पाटील यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी केली होती. यासाठी प्रकाश पट्टेकर सहा दिवसांपासून प्रशासकीय इमारतीसमोर उपोषणाला बसला होता. त्याला रिपब्लिकन विद्यार्थी सेनेतर्फे सक्रिया पाठिंबा दिला होता. संघटनेतर्फे सहा दिवसांपासून आंदोलन करण्यात येत होते. विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्याला प्रवेश देण्यास तयार होते. मात्र, संघटना विभागप्रमुखांवर कारवाई करण्यासाठी आग्रही होती. यासाठी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन निकम, एसएफआयचे लोकेश कांबळे, रिपाइं आठवले गटाच्या युवक संघटनेचे कुणाल खरात, डॉ. किशोर वाघ यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाºयांनी कुलगुरूंची दालनात भेट घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.