आमचे प्रेम अजूनही चार भिंतींमध्येच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:02 AM2021-02-14T04:02:51+5:302021-02-14T04:02:51+5:30
याविषयी सांगताना सदस्य म्हणाले की, समलिंगी संबंधांना गुन्हा ठरविणारे ३७७ कलम रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला मोठा ...
याविषयी सांगताना सदस्य म्हणाले की, समलिंगी संबंधांना गुन्हा ठरविणारे ३७७ कलम रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला मोठा दिलासा दिला असला, तरी सामाजिक स्तरावर मात्र आम्हाला अजूनही मान्यता मिळालेली नाही. कोर्टाचा निर्णय काही अंशी आमच्या कुटुंबीयांचे मतपरिवर्तन होण्यास उपयुक्त ठरला, तरी समाजाचे मतपरिवर्तन होण्यासाठी अजून खूप मोठा काळ जावा लागेल.
एरवी आम्ही एकमेकांना भेटू शकतो, पण व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी मात्र आमच्यावरची बंधने अधिकच आवळली जातात. ना आम्ही काेणत्या हॉटेलमध्ये जाऊन बसू शकतो, ना आम्हाला कोणत्या बागेत किंवा सार्वजनिक ठिकाणी बसण्याची मुभा असते. या दिवशी तर पोलीस अधिकच आमच्या मागावर असतात. त्यामुळे एक तर व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी आम्ही घरीच राहणे पसंत करतो, अन्यथा मग सगळे जण मिळून दुसऱ्या दिवशी आमच्या कार्यालयातच व्हॅलेंटाइन साजरा करतो, असे या मंडळींनी सांगितले.
चौकट :
औरंगाबाद शहर आणि ग्रामीण मिळून एलजीबीटी कम्युनिटीचे सदस्य २,३०० पेक्षाही अधिक आहेत. कायद्याने आम्हाला मान्यता दिली असली, तरी अजूनही समाजाने आमचे प्रेम स्वीकारलेले नाही. त्यामुळे मनातून खूप प्रेम वाटत असले आणि इतर सर्वसाधारण लोकांप्रमाणेच आमचे प्रेम असले, तरी आपल्या व्हॅलेंटाइनसोबत समाजात उघडपणे फिरणे, वावरणे आणि प्रेम व्यक्त करण्याचे भाग्य अजूनही आम्हाला लाभलेले नाही. मोठ्या शहरांमध्ये थोडा-थोडका बदल दिसत असला, तरी औरंगाबादकरांची मानसिकता बदललेली नाही.
- रुद्र काळे, एलजीबीटी कम्युनिटी सदस्य