शेतकऱ्यांना आधार देणे ही आपलीच गरज- पाटेकर
By Admin | Published: September 8, 2015 12:32 AM2015-09-08T00:32:11+5:302015-09-08T00:40:04+5:30
औरंगाबाद : शेतकरी बांधवांनो, आत्महत्या करू नका. हा मोठा गुन्हा आहे. तुम्ही एकटे नाहीत. आम्ही तुमच्या सोबत आहोत. हा आत्मविश्वास देण्यासाठीच आम्ही आलोय.
औरंगाबाद : शेतकरी बांधवांनो, आत्महत्या करू नका. हा मोठा गुन्हा आहे. तुम्ही एकटे नाहीत. आम्ही तुमच्या सोबत आहोत. हा आत्मविश्वास देण्यासाठीच आम्ही आलोय. किरकोळ रकमेचा धनादेश देताना आम्हालाही लाज वाटते. ही मदत नाही. ही सहानुभूतीही नाही. अनुकंपा तर नक्कीच नाही. ही आमची गरज आहे, असे सद्गदित उद्गार प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी सोमवारी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत करताना येथे काढले. तेव्हा सभागृहात अनेकांना आपले हुंदके रोखता आले नाहीत. पाणावलेल्या डोळ्यांनी अनेकांनी हे क्षण हृदयात कोरून बळीराजाच्या उतराईसाठी वज्रमूठ कसली.
औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत यावर्षी मृत्यूला कवटाळलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा धनादेश, साडी व ब्लॅकेटचे वाटप नाना पाटेकर व मराठवाड्याचा भूमिपुत्र, प्रसिद्ध सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे यांच्यातर्फे सोमवारी करण्यात आले. 1
कोणताही पक्ष हा जनतेला सुविधा पुरविण्याचे माध्यम आहे, असे सांगून नाना पाटेकर म्हणाले, मग तो विरोधी पक्ष असो किंवा सरकार. या दुष्काळी परिस्थितीत त्यांनी सोबत येऊन एकत्र काम केले पाहिजे. हा वाईट काळ संपला की तुम्ही परस्परात भांडायला मोकळे आहात. कोणत्याही सरकारवर आपणास टीका करायची नाही, असेही ते म्हणाले.
काहीच नाही, काय करू ?
2हे गेले. मला सासू नाही. सासरा नाही. साडेपाच वर्षाचा मुलगा आणि चार वर्षाची मुलगी आहे. तिघेच राहतो. कुणाचाच सहारा नाही. घर नाही. भाड्याने राहते. घरभाड्याला पैसे नाही. काय खाऊ, कसं राहू, असे म्हणत कविता सोमनाथ राऊत या २२ वर्षीय विधवेला रडे आवरले नाही. ती तेथेच धाय मोकलून रडू लागली. नाना पाटेकरांनी सांत्वन करून तिला शांत केले. परंतु त्यानंतर ती एक शब्दही बोलली नाही.
६७ वर्षे झाली स्वातंत्र्याला सरकारने शेतकऱ्यांसाठी काय तरतूद केली? परंतु आम्ही रॉबिनहूड नाही होऊ शकत, असा उद्वेग व्यक्त करून नाना म्हणाले, सरकार जे देतं ते झिरपत झिरपत खाली जातं.
४हे झिरपणं आम्ही रोखलं पाहिजे. या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविला पाहिजे.