पश्चिम महाराष्ट्राच्या ४६ टक्के क्षेत्रासाठी ७४ टक्के, तर मराठवाड्याला केवळ ८ टक्के पाणी
By बापू सोळुंके | Published: March 24, 2023 02:05 PM2023-03-24T14:05:04+5:302023-03-24T14:09:27+5:30
‘आमचा हक्क,आमचं पाणी’: मराठवाड्याच्या वहितीलायक २७ टक्के क्षेत्रासाठी केवळ ८ टक्के पाणी
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राचा एक प्रांत असलेल्या मराठवाड्याचा इतर प्रांतांसारखाच विकास करणे राज्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांनी निधी वाटपात कायम अन्याय केल्याने मराठवाड्यातील प्रस्तावित अनेक धरणे निधीअभावी २० ते २२ वर्षांपासून अपूर्णच आहेत. परिणामी मागील २० वर्षांत म्हणावी तशी सिंचनक्षमता वाढलेली नाही. मराठवाड्यातील वहितीलायक २७ टक्के क्षेत्रासाठी केवळ ८ टक्के पाणी उपलब्ध आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील वहितीलायक ४६ टक्के क्षेत्रासाठी ७४ टक्के पाणी, तर विदर्भातील २७ टक्के क्षेत्रासाठी १८ टक्के पाणी उपलब्ध आहे.
मराठवाड्यातील ७० टक्के भाग कमी पर्जन्यमानाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. यामुळे मराठवाड्यातील एकूण क्षेत्रफळाच्या २७ टक्के क्षेत्रच वहितीलायक आहे. लहरी निसर्गावर अवलंबून असलेल्या या वहितीलायक क्षेत्राला बाराही महिने सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले तर मराठवाडा सुजलाम-सुफलाम होऊन विकास होईल. राज्यकर्त्यांना माहिती असूनही मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांसाठी भरीव निधी दिला गेला नाही. यामुळे अनेक सिंचन प्रकल्प २० वर्षांपासून अर्धवट आहेत. ते तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. मराठवाड्यातील सिंचनक्षम क्षेत्राचा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाशी तुलना केली तर मराठवाड्यातील पाण्याची भयावह स्थिती नजरेस पडते. मराठवाडा आणि विदर्भात २७ टक्के क्षेत्र वहितीलायक आहे. या दोन्ही प्रांतांमध्ये अनुक्रमे ८ टक्के आणि १८ टक्के पाणी उपलब्ध आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ४६ टक्के वहितीलायक क्षेत्रासाठी तब्बल ७६ टक्के पाणी उपलब्ध आहे. यावरून मराठवाड्यापेक्षा विदर्भात १० टक्के आणि पश्चिम महाराष्ट्राकडे ३८ टक्के पाणी अधिक आहे. या पाण्याचा प्रतिहेक्टर पाण्याचा विचार केला तर मराठवाडा खूप मागे असल्याचे दिसून येते. पश्चिम महाराष्ट्राकडे प्रतिहेक्टर ८ हजार ८०७ घनमीटर पाणी आहे. तर विदर्भाकडे प्रतिहेक्टर ३६१६ घनमीटर पाणी असल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. मराठवाड्याला केवळ १७२९ घनमीटर प्रतिहेक्टर पाणी उपलब्ध आहे.
आंतरराष्ट्रीय मानकानुसार मराठवाडा अतिदुष्काळी क्षेत्रात
आंतरराष्ट्रीय मानकानुसार प्रतिमाणशी १ हजार ते १७ हजार घनमीटर पाणी मिळणे आवश्यक आहे. तर ५०० घनमीटर प्रतिमाणशी यापेक्षा कमी पाणी उपलब्ध झाल्यास तो भाग अतिदुष्काळी म्हणून ओळखला जातो. उर्वरित महाराष्ट्रात प्रतिमाणशी १ हजार ३४६ घनमीटर, तर विदर्भाला ९८५ घनमीटर प्रतिमाणशी पाणी उपलब्ध आहे. मराठवाड्यात प्रतिमाणशी सर्वांत कमी ४३८ घनमीटर पाणी मिळते.
महाराष्ट्राची दुष्काळजन्य स्थिती
पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र-- ५० टक्के क्षेत्र
विदर्भ--------५० टक्के
मराठवाडा------ ७० टक्के