आमचा हक्क आमचं पाणी: मराठवाड्यासाठीच्या नदीजोड प्रकल्पावरही नाशिककरांचा डोळा
By बापू सोळुंके | Published: March 23, 2023 12:59 PM2023-03-23T12:59:56+5:302023-03-23T13:01:23+5:30
कोकणातील वाहून जाणारे गोदावरी खोऱ्यातील पार नदीचे पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्याला देण्याची पार-गोदावरी नदीजोड (स्थलांतरित) योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.
- बापू सोळुंके
छत्रपती संभाजीनगर : दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेती सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने नदीजोड प्रकल्प प्रस्तावित केला आहे. मराठवाड्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या या नदीजोड प्रकल्पाचा लाभही नाशिक भागाला मिळावा, अशी योजनाच नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी करून घेतली आहे. ही योजना राबविताना थेट गोदावरी नदीत पाणी न सोडता ते आधी नाशिक जिल्ह्यातील विविध धरणांत सोडले जाणार आहे.
कोकणातील वाहून जाणारे गोदावरी खोऱ्यातील पार नदीचे पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्याला देण्याची पार-गोदावरी नदीजोड (स्थलांतरित) योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेसाठी २ हजार ७४४ कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. यातून ३.४२ टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. मराठवाड्यासाठी प्रस्तावित योजना असली तरी प्रत्यक्षात पार नदीतून पाणी उचलून नाशिकमधील करंजवन, पुणेगाव या धरणात सोडण्यात येणार आहे. यामुळे ही धरणे भरल्यानंतरच पाणी मराठवाड्याला दिले जाईल. या योजनेच्या पाण्याचा पहिला वापर आपल्या भागासाठी करण्याचा नाशिकच्या लोकप्रतिनिधींचा मनसुबा आहे. दमणगंगा- वैतरणा-गोदावरी या नदीजोड प्रकल्पासाठी ३२९२ कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. या योजनेमुळे ७.१३ टीएमसी पाणी मराठवाड्यासाठी उपलब्ध होणार आहे, असे सांगण्यात येते. मात्र, या योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करताना नाशिक जिल्ह्यालाच कसा लाभ होईल, याची खबरदारी घेण्यात आली. या योजनेचे पाणी पाइपलाइनद्वारे कदवा धरणामध्ये (ता. सिन्नर, जि. नाशिक) सोडले जाईल. हे धरण भरल्यानंतरच ते मराठवाड्यासाठी गोदावरी पात्रात सोडले जाईल. दमणगंगा- एकदरे गोदावरी ही तिसरी प्रस्तावित नदीजोड योजना ८७५ कोटी रुपयांची आहे. या योजनेतून ५.०५ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळेल असे सांगण्यात येते. या योजनेचे पाणीही नाशिक जिल्ह्यातील वाघाड धरणात सोडण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. प्रत्यक्षात या तिन्ही नदीजोड योजना मराठवाड्यातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. असे असताना नाशिककरांनी या योजनांचे पाणी स्वत:च्या जिल्ह्यातील विविध धरणांमध्ये वळवून स्वत:ची सिंचनक्षमता वाढवीत असल्याचे जलतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दुप्पट पाण्याचा नाशिककरांकडून वापर
जायकवाडी प्रकल्पापर्यंत १९६.५ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने या पाण्याची वाटणी करताना नाशिककरांना ११५.५० टीएमसी, तर मराठवाड्याला ८१ टीएमसी पाणी दिले. मात्र, नाशिककरांनी जायकवाडीच्या उर्ध्वभागात विविध धरणे बांधून जायकवाडीत येणारे पाणी तिकडे वळती करून घेतल्याचे समोर आले आहे. मेंढेगिरी अहवालानुसार नाशिककर १६०.९० टीएमसी पाणी वापरतात.
पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली ६.७० टीएमसी पाणी आरक्षित
नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी मराठवाड्याला मिळणाऱ्या गोदावरी खोऱ्यातील ६.७० टीएमसी पिण्याच्या नावाखाली आरक्षित केले आहे. याचा विचार करताना जायकवाडीच्या उर्ध्वभागातून मराठवाड्याला मिळणारे हक्काचे पाणी ठिकठिकाणी त्यांच्या धरणात वळविले आहे.
लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे
मराठवाड्यासाठी प्रस्तावित तीन वेगवेगळ्या नदीजोड योजनांचे लाभ घेण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सक्रिय आहेत. मराठवाड्यासाठी असलेल्या या नदीजोड प्रकल्पाचे पाणी नाशिक जिल्ह्यातील विविध धरणांत सोडले तर ती धरणे भरल्याशिवाय आम्हाला पाणी मिळणार नाही. यामुळे मराठवाड्यासाठी असलेल्या या नदीजोड योजनांचे पाणी पाइपलाइनद्वारे थेट गोदापात्रात पाणी सोडणे आवश्यक आहे. यासाठी मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- शंकर नागरे, माजी तज्ज्ञ सदस्य, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ.