नगर,नाशिक जिल्ह्यात अतिरिक्त प्रकल्प; मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर कोण टाकतोय दरोडा?

By बापू सोळुंके | Published: March 27, 2023 08:25 PM2023-03-27T20:25:52+5:302023-03-27T20:26:15+5:30

जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागात ३४ मोठी आणि मध्यम, १५७ लघुपाटबंधारे आणि कोल्हापूर बंधारे आणि ४०२ (स्थानिक स्तर) लघुपाटबंधारे योजना राबविण्यात आलेल्या आहेत.

'Our right, our water': Who is robbing Marathwada's rightful water? | नगर,नाशिक जिल्ह्यात अतिरिक्त प्रकल्प; मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर कोण टाकतोय दरोडा?

नगर,नाशिक जिल्ह्यात अतिरिक्त प्रकल्प; मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर कोण टाकतोय दरोडा?

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : १५ ऑक्टोबर रोजी जायकवाडी धरणात ६५ टक्के पाणी नसेल तर उर्ध्व भागातील नगर, नाशिकमधील धरणांतून गोदावरी पात्रात पाणी सोडणे बंधनकारक असते. जायकवाडी धरणाच्या उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांत गेल्या काही वर्षांत बांधण्यात आलेल्या अतिरिक्त लहान, मोठी आणि मध्यम धरणे बांधून सुमारे ३ हजार ३०६.७९ दलघमी अतिरिक्त पाणी साठविण्यात आले आहे. या प्रकारामुळे मराठवाड्यातील जनतेच्या हक्काच्या पाण्यावर एकप्रकारे दरोडाच टाकल्यासारखे असल्याचे बोलले जाते.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे गोदावरी नदीवर ४५ वर्षांपूर्वी जायकवाडी धरण बांधण्यात आले होते. या प्रकल्पातून मराठवाड्यातील सुमारे १लाख ८४ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते; मात्र आतापर्यंतही संकल्पित सिंचन शक्य झाले नाही. मराठवाड्यातील सिंचन क्षमतावाढीसोबतच मराठवाड्यासह अहमदनगर आणि जालना, बीड जिल्ह्यांतील विविध गावे आणि शहरांची तहान जायकवाडी प्रकल्पामुळे भागविण्यात येते. कोणत्याही धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये नवीन धरणे बांधली तर धरणात पाणी संचय कमी होताे. परिणामी योजनेचा उद्देश सफल होत नाही. असाच काहीसा अनुभव ‘जायकवाडी’च्या बाबतीत येत आहे.

जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागात ३४ मोठी आणि मध्यम, १५७ लघुपाटबंधारे आणि कोल्हापूर बंधारे आणि ४०२ (स्थानिक स्तर) लघुपाटबंधारे योजना राबविण्यात आलेल्या आहेत. या योजनांमुळे जायकवाडी प्रकल्पापर्यंत उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील संकल्पित पाणीवापर (४ हजार ५५६.१२ दलघमी) हा संकल्पित उपयुक्त साठ्यापेक्षा (३ हजार ३०६.७९ दलघमी) ३८ टक्क्के जादा आहे. गोदावरी नदीला येऊन मिळणाऱ्या प्रवरा नदीवर अहमदनगर जिल्ह्यात निळवंडे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाचा फटकाही जायकवाडी प्रकल्पाला बसला आहे. यासोबत उर्ध्व भागात सात मोठी आणि मध्यम, तर ३१ लघू धरणांचे काम सुरू आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर जायकवाडीत येणारा पाण्याचा स्त्रोत कमी होईल.

१५ ऑक्टोबर रोजी ६५ टक्के धरण भरण्याची अट
समन्यायी पाणीवाटपानुसार १५ ऑक्टोबर रोजी जायकवाडी ६५ टक्के अथवा त्यापेक्षा कमी पाणीसाठा असल्याचे आढळून आल्यास गोदावरी उर्ध्व खोऱ्यातील धरणातून गोदापात्रात पाणी सोडून हा साठा ६५ टक्के करण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाची असते; मात्र वारंवार मागणी करूनही अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील राजकीय पुढारी पाणी सोडण्यास विरोध करतात. अशावेळी जेव्हा राज्यकर्ते ठाम भूमिका घेऊन मरठवाड्यासाठी पाणी सोडण्याचे आदेश देतात तेव्हा पाणी सोडले जाते; मात्र उर्ध्व धरणापासून जायकवाडीपर्यंत पाणी येण्याच्या मार्गात अनेक ठिकाणी कॅनॉलद्वारे पाणी लहान-मोठ्या प्रकल्पांत वळविले जाते. काही वेळा शेतकरी मोटारपंप लावून पाण्याचा वापर शेतीसाठी अथवा शेततळे भरून घेण्यासाठी करतात. तर पाणी सोडण्यास उशीर झाल्यास तापलेल्या वाळूमुळे सोडलेल्या पाण्याच्या ६० टक्केही पाणी जायकवाडीत पोहोचत नाही, असे प्रकार वर्ष २०१२ ते १६ या कालावधीत मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी अनुभवला आहे.

मोठ्या प्रकल्पांना फटका
‘जायकवाडी’च्या उर्ध्व गोदावरी खोऱ्यांतर्गत असलेल्या अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात अतिरिक्त लहान-मोठी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले आहे. शिवाय शासनाने आता ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना आणली. यामुळे शेतकरी शेततळे बांधत आहेत. ही योजना राबविताना शेतकरी कालव्याशेजारीच शेततळी खोदतात आणि कॅनॉल, नदीपात्रातील पाणी उपसा करून साठवितात. याचा फटका मोठ्या प्रकल्पांना बसतो. यंत्रणेवर विश्वास न राहिल्यामुळे सध्या वैयक्तिक स्वैराचारासारखे लोक वागत असल्याचे यातून दिसते.
- प्रा. प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ.

Web Title: 'Our right, our water': Who is robbing Marathwada's rightful water?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.