आपली नदी खाम नदी स्वच्छता अभियान; खामनदीत २४९ ठिकाणी सोडले जाते सांडपाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 03:44 PM2021-04-07T15:44:14+5:302021-04-07T15:45:50+5:30
घाण, कचऱ्यामुळे अत्यंत अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त आणि प्रदूषित झालेले नदीचे पात्र 'आपली नदी खाम नदी स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छ करून नदीला गतकालीन महत्त्व प्राप्त करून देण्याचे महत्त्वाकांक्षी अभियान औरंगाबाद महापालिका, छावणी परिषद , काही सामाजिक आणि अशासकीय संस्था आणि सुजाण नागरिकांच्या सहकार्याने सुरु आहे.
- प्रभुदास पाटोळे
औरंगाबाद : नैसर्गिकरित्या स्वच्छ आणि पिण्यालायक पाणी असल्यामुळे सुमारे चार शतकापूर्वी ज्या नदीच्या तीरावर तत्कालीन 'खडकी' गाव आणि आजचे 'औरंगाबाद' शहर वसले , त्या खाम नदीच्या पात्रातून सध्या पाण्याऐवजी सांडपाणीच वाहते आहे. तब्बल २४९ ठिकाणी या नदीपात्रात मलयुक्त पाणी सोडले जात असल्याचे एका पाहणीतून समोर आले.
घाण, कचऱ्यामुळे अत्यंत अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त आणि प्रदूषित झालेले नदीचे पात्र 'आपली नदी खाम नदी स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छ करून नदीला गतकालीन महत्त्व प्राप्त करून देण्याचे महत्त्वाकांक्षी अभियान औरंगाबाद महापालिका, छावणी परिषद , काही सामाजिक आणि अशासकीय संस्था आणि सुजाण नागरिकांच्या सहकार्याने सुरु आहे. २५ जानेवारीपासून सुरु केलेल्या या अभियानांतर्गत ७ फेब्रुवारी आणि ६ मार्च २०२१ ला दर शनिवारी सकाळी ७:३० ते १०:३० दरम्यान पहिल्या टप्प्यात आयकर कार्यालयालगत लोखंडी पुलाजवळील नदी पात्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. भिंत चित्रीकरण आणि बारापुल्ला पुलाखाली पाणी अनुकूल अर्जुन, अश्वगंधा , शिरीष , कांचन , करंज , खैर , अडुळसा आदी ३४ भारतीय जातीच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. येथे गुलमोहरसारख्या वृक्षांचे रोपण केल्यास परिसरातील निसर्ग सौंदर्यात भर पडेल, असे निसर्ग प्रेमींचे म्हणणे आहे. मात्र, सध्या कोविडच्या उद्रेकामुळे शहरात जमावबंदी लागू असल्याने हे अभियान तूर्तास स्थगित झाले आहे. परिस्थिती निवळताच पुन्हा अभियान सुरु होणार आहे .
दुधना नदीच्या खोऱ्यात नदीचा उगम
सातारा पर्वतरांगा आणि जटवाडा टेकड्यांच्यामध्ये दुधना नदीच्या खोऱ्यात खाम नदीचा उगम होतो. सध्याच्या औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती भागातून गंगापूर तालुक्यातील येसगाव येथपर्यंत ७२ किमीच्या पट्ट्यातून वाहत जाऊन खाम नदी गोदावरी नदीत नाथसागरात जाऊन मिळते. या ७२ किमीच्या दरम्यान औरंगाबादेतील विविध वसाहती, आस्थापना आणि औद्योगिक वसाहती मधून २४९ ठिकाणी सांडपाणी, रसायनयुक्त पाणी, घनकचरा, मलमूत्र आणि इतर घाण नदी पात्रात सोडली जाते, असे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात आढळले आहे.