'आपला भगवा, आपली शिवसेना'; बंडखोरीनंतर शिवसेनेची पुन्हा मोर्चेबांधणीला सुरुवात
By बापू सोळुंके | Published: August 4, 2022 06:34 PM2022-08-04T18:34:41+5:302022-08-04T18:35:12+5:30
७ ते २० ऑगस्टदरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात मोहीम
औरंगाबाद : महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील पाच आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत पक्षाचे काही पदाधिकारीही गेले होते. या बंडखोरीचा फटका आगामी जि. प., पं. समित्या आणि महापालिकेच्या निवडणुकीत बसू नये, यासाठी शिवसेनेने पुन्हा एकदा पक्षबांधणीकडे लक्ष दिले आहे. जिल्ह्यात ७ ते २० ऑगस्टदरम्यान आपला भगवा, आपली शिवसेना मोहिमेचे आयोजन केले आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत या माेहिमेची माहिती दिली. दानवे म्हणाले की, शिवसेनेचे जिल्ह्यातील पाच आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यानंतर तीन नगरसेवक, एक तालुकाप्रमुख, तीन उपशहर, एक, दोन विभागप्रमुख शिंदे गटाला जाऊन मिळाले. असे असले तरी सामान्य शिवसैनिक आणि उर्वरित ९९ टक्के पदाधिकारी आजही पक्षासोबत आहेत शिवाय नवीन पदाधिकाऱ्यांच्या तत्काळ नेमणुका करण्यात आल्या. लवकरच जि. प., पं. स. आणि महापालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये पक्षाच्या निष्ठावंतांचाच विचार केला जाणार आहे. यासाठी ७ ते २० ऑगस्टदरम्यान आपण पदाधिकाऱ्यांसह मोहीम राबवत आहोत. मोहिमेत शिवसेेनेचे आजी, माजी पदाधिकारी, महिला आघाडी आणि लोकप्रतिनिधी सहभागी होतील, असे आ.दानवे म्हणाले. पत्रकार परिषदेला कृष्णा डोणगावकर, आनंद तांदूळवाडीकर, गोपाल कुलकर्णी, प्रतिभा जगताप आदींची उपस्थिती होती.
अशी असेल मोहीम
७ ते २० ऑगस्टदरम्यान जिल्ह्यात आपला भगवा, आपली शिवसेना ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यात ७, ८ ऑगस्टला कन्नड, सोयगाव, ९ आणि १२ ऑगस्टला वैजापूर, १५ ऑगस्टला खुलताबाद, १६ रोजी औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघ, १७ रोजी पूर्व मतदारसंघ, १९ ऑगस्टला पश्चिम मतदार संघातील ग्रामीण भागात तर २० रोजी पश्चिम मतदारसंघातील शहरी भागांत ही मोहीम राबविली जाईल.