१०० कोटींतील ३१ पैकी १६ रस्त्यांचे काम ढिम्मपणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:09 AM2019-06-21T00:09:29+5:302019-06-21T00:09:49+5:30
महापालिकेने दीड वर्षानंतर एप्रिल महिन्यापासून शहरात शंभर कोटींच्या सिमेंट रस्त्यांची कामे केली. मात्र, अतिक्रमणे आणि रस्त्यांच्या मध्यवर्ती मोजमापांमुळे अनेक ठिकाणचे काम रखडले आहे. रस्त्याच्या मध्यवर्ती केंद्रबिंदूवरून काही ठिकाणी वाद आहे. काही ठिकाणी ड्रेनेज लाईन आणि जलवाहिन्या बदलण्याचा तर काही ठिकाणी अतिक्रमणांचा अडथळा आहे.
औरंगाबाद : महापालिकेने दीड वर्षानंतर एप्रिल महिन्यापासून शहरात शंभर कोटींच्या सिमेंट रस्त्यांची कामे केली. मात्र, अतिक्रमणे आणि रस्त्यांच्या मध्यवर्ती मोजमापांमुळे अनेक ठिकाणचे काम रखडले आहे. रस्त्याच्या मध्यवर्ती केंद्रबिंदूवरून काही ठिकाणी वाद आहे. काही ठिकाणी ड्रेनेज लाईन आणि जलवाहिन्या बदलण्याचा तर काही ठिकाणी अतिक्रमणांचा अडथळा आहे. या कारणांमुळे रस्त्यांची कामे ढिम्मपणे सुरू असल्याची माहिती गुरुवारी महापौरांनी घेतलेल्या आढावा बैठकीत समोर आली. ही अडथळ्यांची शर्यत जोपर्यंत पार होत नाही, तोपर्यंत कामांना गती येणे शक्य नाही.
सध्या ३१ पैकी १६ रस्त्यांची कामे संथगतीने सुरू आहेत. आजवर २० टक्के इतकेच काम झाल्याचे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना अडथळ्यांचा पाढा वाचला. चार रस्त्यांच्या मध्यवर्ती केंद्रबिंदूबाबत प्रशासनाला काहीही कल्पना नाही. त्यामुळे रस्त्यांचे काम सुरू होऊ शकलेले नाही. आता नगररचना विभागाकडून मोजणी करून मध्यबिंदू निश्चित करण्यात येणार आहे. सिडकोतील जुन्या ड्रेनेज लाईन आणि अंतर्गत जलवाहिन्यांची कामे ठप्प आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे. सर्व अडथळे दूर करावीत, अतिक्रमणे काढावीत, १५ जुलैपर्यंत किमान १० रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, उर्वरित रस्त्यांची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याच्या दिशेने काम करण्याच्या सूचना महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रशासनाला दिल्या.
या रस्त्यांचे सुरू आहे काम
आझाद चौक ते बजरंग चौक
चिकलठाणा आठवडी बाजार ते सावंगी बायपास
महाराष्ट्र डिस्टीलरीज् ते ब्ल्यू बेल्स
सिडको एन- १ पोलीस चौकी ते प्रोझोन मॉल
सोहम मोटर्स ते महालक्ष्मी चौक
शाहूनगर ते मौर्या मंगल कार्यालय
कामगार चौक ते हायकोर्ट
जानकी हॉटेल ते मेहरसिंग नाईक शाळा
सेव्हन हिल ते आझाद चौक ते संभाजी महाराज चौक
पीरबाजार ते जानकी हॉटेल
हर्सूल टी पॉइंट ते डॉ.भोपळे यांचे घर
निराला बाजार ते मनपा मुख्यालय
संताजी पोलीस चौकी ते गंगासागर सोसायटी नक्षत्रवाडी
सिद्धार्थ चौक ते ताज हॉटेल
बजरंग चौक ते चिश्तिया कॉलनी
-----------