देशभरात सुरु होणाऱ्या ७५ डिजिटल बँकापैक्की चार महाराष्ट्रात: डॉ. भागवत कराड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 07:16 PM2022-09-06T19:16:07+5:302022-09-06T19:16:40+5:30
डिजिटल बँक शाखेत बँकिंग उत्पादने आणि सेवा वितरित करण्यासाठी तसेच बँकांकडील विद्यमान आर्थिक उत्पादने आणि सेवा डिजिटल पद्धतीने देण्यासाठी एक विशिष्ट व्यवसाय केंद्र असेल.
औरंगाबाद : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी देशभरात ७५ डिजिटल बँका सुरू होत आहेत. त्यात राज्यात नागपूर, औरंगाबाद, मुंबई आणि सातारा जिल्ह्यांत प्रत्येकी एक अशा चार बँका सुरू होणार आहेत. औरंगाबादेतील बँक गजानन महाराज मंदिर परिसरात असेल. त्यासाठी जागाही निश्चित केल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राज्यस्तरीय बँकर्स कमिटीची बैठक पहिल्यांदाच सोमवारी औरंगाबादेत झाली. बैठकीनंतर कराड यांनी निर्णयांची माहिती दिली. बँकर्स कमिटीची दर तीन महिन्यांनी होणारी ही १५६ वी बैठक होती. बारा सार्वजनिक बँका, खासगी बँकांचे एमडी प्रत्यक्ष तर राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत सहभागी होते. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, नाबार्डचे सीजीएम जी. एस. रावत, बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक विजयकुमार, आदींची उपस्थिती होती. बैठकीत मुद्रा कर्ज योजनेच्या थकीत कर्जासह विविध योजना, पीककर्ज वाटपासह शासकीय योजनांचा आढावा घेतला गेला.
काय आहे डिजिटल बँक ?
डिजिटल बँक शाखेत बँकिंग उत्पादने आणि सेवा वितरित करण्यासाठी तसेच बँकांकडील विद्यमान आर्थिक उत्पादने आणि सेवा डिजिटल पद्धतीने देण्यासाठी एक विशिष्ट व्यवसाय केंद्र असेल. ग्राहकांना स्वयं-सेवाअंतर्गत, किफायतशीर, कागदरहित, सुरक्षित वातावरणात बँकांची उत्पादने आणि सेवांचा डिजिटल लाभ घेता येईल. व्यवसाय आणि सेवांमधून उद्भवलेल्या ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पुरेशी डिजिटल यंत्रणा असेल. शिवाय या बँकांच्या माध्यमातून ठेवी स्वीकारणे आणि कर्ज सेवा पुरविल्या जातील. बँकांच्या डिजिटल बँकिंग कक्षांना, बँकिंग आऊटलेट, शाखाच मानले जाईल.
१६२८ गावांमध्ये बँक प्रतिनिधी
राज्यात बँक व्यवहार नसणारी तीन हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येची ३३ गावे असून या गावात डिसेंबर अखेरपर्यंत बँक शाखा सुरू करण्याचा निर्णय बँकर्स समितीच्या बैठकीत झाला. तसेच राज्यातील १६२८ गावांमध्ये बँक नाही, तेथे बँक प्रतिनिधी नेमण्यात येणार आहेत. केंद्रीय वित्त सेवा विभागाने बँक शाखा सुरू करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते, असे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. कराड यांनी सांगितले.