हम नही सुधरेंगे! सकाळी हर्सूल कारागृहातून बाहेर; मध्यरात्री १२ नंतर पुन्हा घरफोडी
By राम शिनगारे | Published: September 15, 2022 03:39 PM2022-09-15T15:39:30+5:302022-09-15T15:40:56+5:30
आरोपीच्या विरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये १० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.
औरंगाबाद : सराईत घरफोडी करणारा सकाळी ११ वाजेच्या सुमारास चोरीच्या गुन्ह्यातून हर्सूल कारागृहाच्या बाहेर आला. त्याने बाहेर येताच दुपारनंतर घरफोडी करण्यासाठी निराला बाजार येथील एका कार्यालयाची रेकी केली. मध्यरात्रीनंतर दुकान फोडत १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना ३ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ईश्वर महादेव गौडा यानेच चोरी केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर क्रांतीचौक पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक डॉ.गणपत दराडे यांनी दिली.
रेकॉर्डवरील आरोपी ईश्वर गौडा हा चोरीच्या गुन्ह्यात २ सप्टेंबर रोजी सकाळी हर्सूल कारागृहातून बाहेर आला होता. घरी पोहचल्यानंतर त्याने बाहेर पडत चोरी करण्यासाठी निराजा बाजार भागात रेकी केली. मध्यरात्री १२ वाजेच्या नंतर त्याने आयुष गंगवाल यांचे निराजा बाजार येथेील ऑफिस फोडले. त्यातुन १५ हजार रुपयांचे चांदीचे तीन शिक्के, ७५ हजार रुपये किंमतीची ५ संगणक चाेरले. त्यानंतर सावन चुडीवाल यांच्या ऑफीस फोडून २ हजार रुपये रोख, स्वप्निल उपाध्याय यांच्या ऑफिसमधून १५ हजार रुपयांची संगणकाची हार्डडिस्क, डॉ. मुंदडा यांच्या कार्यालयातुन दोन पोर्टेबल सीसीटीव्ही कॅमेरा असा एकुण १ लाख ११ हजा रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.
या घटनेच्या गुन्ह्याचा तपास विशेष पथकाचे उपनिरीक्षक विकास खटके, तपास अधिकारी उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांच्या पथकाने केला. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर गौडा यानेच चोरी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार गौडा यास ताब्यात घेत चौकशी केल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली. तसेच ४४ हजार रुपयांची मुद्देमालही काढुन दिला. ही कामगिरी निरीक्षक डॉ. दराडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक खटके, साेनवणे, हवालदार संतोष मुदिराज, नरेंद्र गुजर, इरफान खान, भाऊलाल चव्हाण, संतोष सूर्यवंशी, हनुमंत चाळणेवाड, कृष्णा चौधरी यांच्या पथकाने केली.
दहा पेक्षा अधिक गुन्हे
ईश्वर गौडा याच्या विरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये १० पेक्षा अधिक घरफोडी, शटर उचकटून चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत. कारागृहात बाहेर येताच पुन्हा चोऱ्या करण्याचे कारनामे गौडा करीत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.