शाळा सोडून गेलेली १७ मुले पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 12:26 AM2018-12-04T00:26:53+5:302018-12-04T00:28:49+5:30

शिक्षकांनी केलेले समुपदेशन फलदायी : पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड कामगारांनी केले होते स्थलांतर

 Out of school leaving 17 children in the stream of education again | शाळा सोडून गेलेली १७ मुले पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात

शाळा सोडून गेलेली १७ मुले पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा : पोटाची खळगी भरण्यासाठी परजिल्ह्यात गेलेल्या ऊसतोड कामगारांचे समुपदेशन करून त्यांच्या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकांनी केलेल्या परिश्रमाला यश मिळाले आहे. शिक्षकांनी केलेल्या या कौतुकास्पद कारवाईमुळे तब्बल १७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
वैजापूर तालुक्यातील खंडाळा केंद्रांतर्गत असलेल्या ब्रम्हमळा प्राथमिक शाळेत एकूण ३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील सर्वाधिक मुले ही ऊसतोड कामगारांची आहे. परिसरात दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने व हाताला काम मिळत नसल्याने येथील अनेक कुटुंबे ऊसतोडीसाठी परजिल्ह्यात गेले आहे. यामुळे या शाळेत शिक्षण घेणारे १७ विद्यार्थी कुटुंबासोबत कळवण तालुक्यातील पाळे या गावी स्थलांतरित झाले होते. त्यामुळे शाळेत केवळ १३ विद्यार्थीच शिक्षण घेत होते. शाळेचे मुख्याध्यापक राहुल जेजूरकर, शिक्षक अनिल दाणे यांच्या पुढाकाराने व वैजापूर पं.स.चे गटशिक्षणाधिकारी मनीष दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी धनंजय कांबळे, केंद्रप्रमुख राजेंद्र पाटील यांनी प्रत्यक्ष पाळेगावातील उसाच्या शेतात जाऊन ऊसतोड कामगारांना शिक्षणाचे महत्त्व विशद करून चर्चेद्वारे मन परिवर्तन केले.
यामुळे शाळा सोडून गेलेली १७ मुले पुन्हा शाळेत आली आहे. शाळेत दाखल होताच या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर निरागस हास्य खुलले होते. विशेष म्हणजे या संपूर्ण विद्यार्थ्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी शाळेतील २ शिक्षकांनी घेतली आहे. या उपक्रमामुळे सर्वच स्तरातून शाळेचे कौतुक होत आहे.
४ग्रामीण भागात समाजातील शेवटच्या वंचित घटकातील कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शिक्षण अधिकार कायदा करून वाड्या वस्त्यांवर वस्ती शाळा सुरू करण्यात आल्या आहे; परंतु हातावर पोट असणारे कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरित होत असल्याने अनेक विद्यार्थी शिक्षण प्रवाहातून दूर होत आहे.
४खंडाळा परिसरातील स्थलांतरित कामगारांची अनेक मुले आज प्राथमिक शिक्षणापासून वंचित असून, शिक्षण विभागाने परिसरातील तांड्यांवर जाऊन कामगारांमध्ये शिक्षणाबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.

Web Title:  Out of school leaving 17 children in the stream of education again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.