औरंगाबाद जिल्ह्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला; आरोग्य यंत्रणा झाली सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 07:35 PM2020-08-17T19:35:15+5:302020-08-17T19:36:58+5:30
घरांच्या सर्वेक्षणासह विविध उपाययोजना
औरंगाबाद : पावसाच्या संततधारेबरोबर शहर आणि ग्रामीण भागात डेंग्यूने डोके वर काढले आहे. औरंगाबादेत एक आणि ग्रामीण भागात एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात ५ महिन्यांपासून कोरोना विषाणूचा कहर सुरू आहे. या सगळ्यात यंदा सुदैवाने जुलै महिन्यापर्यंत डेंग्यू गायब होता. मात्र, आॅगस्ट महिन्यात कोरोनापाठोपाठ डेंग्यूनेही डोके वर काढले आहे. शहरातील एमजीएम परिसरातील ६ वर्षांच्या मुलाला आणि लोहगाव-पैठण येथील १६ वर्षांच्या मुलाला डेंग्यूची लागण झाली आहे. या दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे देण्यात आली.
डेंग्यू नियंत्रणासाठी ग्रामीण भागात घरांचे सर्वेक्षण करणे, डास नष्ट होण्यासाठी विविध उपाययोजना, कोरडा दिवस, धूर फवारणी आदी उपाययोजना केल्या जात असल्याचे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी सांगितले. महापालिकेतर्फे डेंग्यू प्रतिबंधासाठी अबेटिंग विशेष मोहिमेअंतर्गत १७ जुलै रोजी शहरातील सर्व ९ झोनमध्ये ४ हजार ३५७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. तेव्हा पाण्याचे कंटेनर्स रिकामे करण्यासह ३३ डास उत्पत्तीच्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली. कोरोनाबरोबर डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
नागरिकांनी घ्यावी काळजी
एडिस इजिप्त हा डास चावल्यानंतर डेंग्यूची लागण होते. हा डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालत असल्याने त्याची झपाट्याने पैदास होते. त्यामुळे डेंग्यू आटोक्यात आणण्यासाठी पाणी जास्त दिवस साठवून राहणार नाही, याची नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.