सततच्या लॉकडाऊनने वाढले मुलांचे वजन; कोरोनाकाळात मैदानी खेळ कमी आणि अतिसेवन वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 05:45 PM2021-03-24T17:45:40+5:302021-03-24T17:53:20+5:30

कोरोनामुळे शाळेत जाणे बंद झाले व घरातच ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. परिणामी मुलांची संपूर्ण जीवनशैली बदलून गेली.

Outdoor sports reduction and overeating; Children's weight increased due to continuous lockdown | सततच्या लॉकडाऊनने वाढले मुलांचे वजन; कोरोनाकाळात मैदानी खेळ कमी आणि अतिसेवन वाढले

सततच्या लॉकडाऊनने वाढले मुलांचे वजन; कोरोनाकाळात मैदानी खेळ कमी आणि अतिसेवन वाढले

googlenewsNext
ठळक मुद्देमुले वाढत्या कोरोनामुळे जवळपास घरबंद असून मोबाईलकडे जास्त वळलीकोरोनामुळे बालकांचे आयुष्य चार भिंतींत बंदिस्त झाले आहे. हृदयदाब वाढणे, मधुमेह होण्याची व्यक्त केली जाते भीती

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : कोरोनामुळे शाळा उघडल्या नाहीत; यामुळे मुले घरूनच ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. मैदानी खेळ कमी झाले. दर दोन तासांनी भूक लागतेय. यामुळे मुलांमध्ये स्थूलता वाढली. बालकांच्या नैसर्गिकरीत्या वाढणाऱ्या वजनापेक्षा तीन ते पाच किलोंनी जास्त वजन वाढत असल्याचे डॉक्टरांना अभ्यासात आढळून आले. यामुळे बालकांमध्ये मधुमेह व हृदयदाब यांसारखे (बीपी) आजार बळावू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

कोरोनामुळे बालकांचे आयुष्य चार भिंतींत बंदिस्त झाले आहे. वर्षभरापूर्वी शालेय विद्यार्थी सकाळी लवकर उठून स्नान करीत, गणवेश घालत व दूध पिऊन किंवा कोणी नाष्टा करून सकाळी सात वाजता शाळेत जात. दुपारी जेवण, सायंकाळी खेळ आणि दुसऱ्या दिवशी शाळेत जायचे म्हणून वेळेवर जेवण आणि झोपी जाणे हा दिनक्रम होता. मात्र, कोरोनामुळे शाळेत जाणे बंद झाले व घरातच ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. परिणामी मुलांची संपूर्ण जीवनशैली बदलून गेली. संसर्ग टाळण्यासाठी बालकांना सामूहिक खेळासाठी मैदानात जाऊ दिले जात नाही. घरातच किंवा अंगणात खेळावे लागत आहे. दर दोन तासांनी भूक लागत आहे. त्यात फास्ट फूड, चिप्स, कुरकुरे, आइस्क्रीम खाण्याचे प्रमाण वाढले आहे. मुली सोशल मीडियावर पाहून केक, पिझ्झा बनविणे शिकल्या आहेत. बैठ्या जीवनशैलीचा परिणाम अतिरिक्त वजन वाढण्यावर झाला आहे.

‘मुलाचे वजन वाढले, पोटाचा घेर वाढला आहे. चिडचिड वाढली, मोबाईलशिवाय त्याला काहीच सुचत नाही, एकलकोंडा झाला आहे,’ अशा तक्रारी घेऊन आई-वडील मुलांना डॉक्टरकडे आणत आहेत. पण अजूनही अनेक पालक असे आहेत की, त्यांना असे वाटते की, मुलाचे वाढते वय आहे. शाळा सुरू झाल्यावर वजन कमी होईल. मात्र हा गैरसमज असल्याने मुलांच्या अतिरिक्त वजन वाढण्याकडे दुर्लक्ष केले जात असून हेच मुलाच्या तब्येतीच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकेल, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

लहान वयात मधुमेह होऊ होऊ शकतो,
१३ वर्षे वयोगटातील बालकांचे वजन उंचीनुसार नैसर्गिकरीत्या वर्षाला तीन किलो वाढणे अपेक्षित आहे. मात्र, शहरातील ३५ मुलांवर करण्यात आलेल्या अभ्यासानुसार या मुलांचे वजन मागील वर्षी सहा महिन्यांतच तीन ते पाच किलोंदरम्यान वाढले असल्याचे दिसून आले. बदललेल्या जीवनशैली व मुलांच्या शरीरात वेगाने होणाऱ्या बदलाकडे वेळीच लक्ष दिले नाही तर मुलांना लहान वयात मधुमेह होऊ होऊ शकतो, हृदयदाब वाढू शकतो.
- डॉ. प्रीती फटाले, बालस्थूलता तज्ज्ञ

शारीरिक हालचाल मंदावली
कोरोना व लॉकडाऊनमुळे सर्वाधिक बंधन शालेय विद्यार्थ्यांवर आली आहेत. शाळा बंद असल्याने खेळ, कसरतीला मुले मुकली आहेत. जिम्नॅशियन बंद, स्विमिंग पूल बंद, मैदानावर खेळता येत नाही, शारीरिक श्रम कमी झाले. याचा त्यांच्या शरीरावर परिणाम झाला आहे. प्रमाणापेक्षा अती खाल्ले जात आहे. यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढला आहे. हा बदल ३० ते ४० टक्के मुलांमध्ये प्रखरतेने जाणवत आहे.
- डॉ. सागर कुलकर्णी, बालरोगतज्ज्ञ

मुलांनी हे करावे :
* घरातच व्यायाम करावा.
* सूर्यनमस्कार, दोरीवरच्या उड्या माराव्या.
* आई-वडिलांसोबत योगा, प्राणायाम करावा.
* ऑनलाईन डान्स, गायनाचे क्लास चालतात. तेही जॉईंन करू शकता.
* बाग काम करावे, स्वयंपाकघरात जाऊन पौष्टिक पदार्थ बनविणे शिकावे.
* ऑनलाईन ग्रुप तयार करून शिकावे व दुसऱ्यांना शिकवावे.
* छंद जपावा. त्यात आई-वडिलांनी मुलांना सहकार्य करावे.
* वेळेवर नाष्टा, जेवण करावे.
* घरातील घरात शारीरिक श्रम होतील, असे काम करावे.

मुलांनी हे टाळावे :
* फास्टफूड खाणे टाळावे.
* मोबाईलचा अतिवापर टाळावा.
* गर्दीत जाणे टाळावे.
* उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे.
* विना मास्क बाहेर जाणे टाळावे.
* बैठकी खेळ जास्त खेळू नाही.
* एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहू नाही.
* अवेळी भूक नसताना काहींना काही खाणे टाळावे.
* रात्री उशिरापर्यंत जागू नये, सकाळी उशिरा उठू नये.

Web Title: Outdoor sports reduction and overeating; Children's weight increased due to continuous lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.