गुरू-शिष्य नात्याला काळीमा! १३ वर्षीय राष्ट्रीय खो-खो खेळाडू मुलीवर प्रशिक्षकाचा अत्याचार
By सुमित डोळे | Published: October 15, 2024 11:23 PM2024-10-15T23:23:26+5:302024-10-15T23:24:35+5:30
राष्ट्रीय स्पर्धेसाठी मुंबईला घेऊन जाण्याच्या बहाण्याने खेळाडू मुलीस घेऊन आला छत्रपती संभाजीनगरला
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या १३ वर्षीय विद्यार्थिनीवर प्रशिक्षकानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिवाजी जगन्नाथ गोरडे ( रा. मु.पो. बालानगर, ता. पैठण) असे विकृताचे नाव असून त्याच्यावर वेदांतनगर पोलीस ठाण्यामध्ये मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या शोधासाठी पथक पैठणला रवाना झाल्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण यादव यांनी सांगितले.
१३ वर्षीय पिडीतेच्या आईने या प्रकरणी पोलिसांकडे ठाण्यात तक्रार दाखल केली. पिडीत तरुणीची राष्ट्रीय स्तरावरील खो खो स्पर्धेसाठी निवड झाली होती. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिवाजीने तिच्या पालकांना त्यासाठी रात्री १० वाजता रेल्वेने मुबंईला निघायचे असल्याचे सांगितले. पालकांनी त्याच्यावर विश्वास ठेवत त्याच्यासोबत मुलीला पाठवले. दुपारी २ वाजता त्याने तिला शहरात आणत रेल्वेस्थानक परिसरातील हाँटेल पंजाब येथे जेवण्याच्या बहाण्याने नेले. परंतु थेट खोलित नेत थेट तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने प्रतिकार केला. परंतु त्याने धमकावत मुलगी रडत असतानाही तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मुलीला वेदना सुरू झाल्याने तिने पालकांना संपर्क केला. तोपर्यंत आरोपी शिवाजीने वेगवेगळे कारण सांगून पोबारा केला होता.
मैत्रिणीच्या माध्यमातून संपर्क केला
सुरुवातीला मुलीने घाबरून कुटुंबाला काहीच सांगितले नाही. मात्र शिवाजीने त्याचा गैरफायदा घेत तिच्या मैत्रीणीच्या माध्यमातून
संपर्क केला. सातत्याने भेटण्यासाठी दबाव टाकून धमकावणे सुरू केले. त्याचा त्रास वाढत चालल्याने तरुणीने कुटुंबाला हा प्रकार सांगितला. पहिले कुटुंब पैठण पोलीस ठाण्यात गेले. मात्र, तिथे त्यांना वेदांतनगर ठाण्यात जाण्यास सांगितले. मंगळवारी यादव यांनी तत्काळ यात गुन्हा दाखल केला.
करिअर संपण्याची भीती
तालुका पातळीवरील एका शाळेची विद्यार्थी असताना ही १३ वर्षीय तरुणीने मोठ्या कष्टाने खो खो खेळात प्राविण्य मिळवले. पहिले स्थानिक, आंतरजिल्हा, राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळवले. त्यानंतर तिची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. मात्र, अत्याचाराच्या घटनेने खेळाचे करिअर च संपण्याच्या भीतीने तरुणी तणावाखाली गेली. विशेष म्हणजे, आरोपी शिवाजी हा देखील राष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू राहिला असून विवाहित आहे.
हॉटेल मालकीण, व्यवसापक ही आरोपी
या गुन्ह्यात वेदांतनगर पोलिसांनी अत्याचार झालेल्या द पंजाब ग्रेट हॉटेलची मालकीण पूजा रोहित राठोड व व्यवस्थापक सादिक मिर्झा बेगला गुन्ह्यात सहआरोपी केले आहे. मुलगी नाबालिक असताना प्रवेश दिला कसा, तिचे ओळखपत्र का तपासले नाही, असे प्रश्नही उपस्थित झाले. त्यामुळे बेजबाबदार दोघांना सहआरोपी करण्यात आल्याचे निरीक्षक प्रविणा यादव यांनी स्पष्ट केले.