संतापजनक! धावत्या रिक्षात चालकाचे विद्यार्थिनीसमोर पॅण्ट खाली करत अश्लील कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 12:35 PM2024-08-24T12:35:57+5:302024-08-24T12:38:35+5:30
विकृताचे संतापजनक कृत्य : रात्री उशिरापर्यंत आरोपीचा शोध सुरू
छत्रपती संभाजीनगर : तुला पैसे लागतात का, असे म्हणत एका विकृत रिक्षाचालकाने विद्यार्थिनीसमोर चालत्या रिक्षात पॅण्ट काढून अश्लील कृत्य केले. शुक्रवारी सकाळी ८ वाजता पंचवटी चौकात ही संतापजनक घटना घडली.
वाळूजमधील १७ वर्षीय मुलगी शहरातील नामांकित पॉलिटेक्निक महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकते. ती नियमित वाळूजवरून महावीर चौक व तेथून दुसऱ्या रिक्षाने महाविद्यालयात ये-जा करते. शुक्रवारी सिटी बसने ७:४० वाजता बाबा पेट्रोलपंपाजवळील महावीर चौकात उतरून रिक्षात बसली. तेव्हा रिक्षाचालकाने तिच्या कुटुंबाविषयी विचारणा सुरू केली. तुझा पाय दुखतो का, घरी पैशांची अडचण आहे का, मी तुला पैसे देतो, असे म्हणाला. तरुणीने त्याला रिक्षा थांबविण्यास सांगितले. मात्र, त्याने रिक्षा थांबवली नाही.
आरडाओरड करताच पळून गेला
पंचवटी चौकातून जय टॉवरमार्गे रिक्षा रेल्वेस्थानकाच्या दिशेने जात असताना चालकाने अचानक पॅण्ट अर्धवट खाली करून अश्लील कृत्य केले. हे पाहून मुलगी घाबरून गेली. तिने आरडाओरड सुरू केली. चालकाने रिक्षा थांबवताच ती तत्काळ खाली उतरून रिक्षापासून दूर झाली. हे पाहून रिक्षाचालकाने वेगात पाेबारा केला. त्यानंतर तिने कुटुंबीयांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
सीसीटीव्हीवरून तपास सुरू
रिक्षाचा क्रमांक एमएच २०-५६६८ असा असल्याचा अंदाज मुलीने पोलिसांकडे व्यक्त केला. चालक २२ ते ३० वर्षे वयोगटातील हिंदी भाषिक असल्याचे तिने सांगितले. वेदांतनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास सुरू केला. दोन पथक शोध घेत असून, लवकरच रिक्षाचालकाला अटक केली जाईल, असे निरीक्षक प्रवीणा यादव यांनी सांगितले.
रिक्षाचालकांवर नियंत्रण कोणाचे?
शहरात यापूर्वी रिक्षाचालकांकडून प्रवासी महिलांशी अश्लील कृत्य केल्याच्या, लूटमारीच्या घटना घडल्या आहेत. अनेक गुन्हेगार आता रिक्षा व्यवसायात उतरले असून, रात्री लूटमार करतात. शहर पोलिसांकडून याबाबत गंभीर पावले उचलले जात नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
'स्मार्ट सिटी'चे कॅमेरे बंद
पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी सर्वप्रथम बाबा चौकात धाव घेतली. मात्र, तेथील स्मार्ट सिटीने कोट्यवधी रुपये खर्च करून बसवलेले अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. दुपारी ३ वाजता ते सुरू झाले. परिणामी, तपासावर परिणाम झाला. शिवाय, रेल्वेस्थानक परिसरातील बहुतांश कॅमेऱ्यांच्या दिशाच चुकलेल्या असल्याने कॅमेरे असूनही अनेकदा महत्त्वाचे चित्रण पोलिसांना मिळत नाही.