विरोधी पक्षांपेक्षा सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचाच आक्रमक पवित्रा
By Admin | Published: February 16, 2016 11:46 PM2016-02-16T23:46:14+5:302016-02-17T00:38:51+5:30
बीड : चारा छावण्या बंदच्या सोमवारी झालेल्या निर्णयाविरुद्ध मंगळवारी जिल्हाभर संतापाची लाट उसळली. सरकारविरोधात विरोधी प
बीड : चारा छावण्या बंदच्या सोमवारी झालेल्या निर्णयाविरुद्ध मंगळवारी जिल्हाभर संतापाची लाट उसळली. सरकारविरोधात विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी तर रोष व्यक्त केलाच;पण सत्तेत वाटेकरी असलेल्या पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीच अधिक आक्रमक पवित्रा घेतला.
सरकार शेतकरी विरोधी आहे... झोपेत धोंडा घातल्यागत निर्णय घेतला...असा सूर आवळत शिवसंग्राम संघटनेच्या पालवण (ता. बीड) येथील छावणीत पशुपालक एकवटले. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याबरोबरच शासननिर्णयाची होळी करण्यापर्यंत टोकाचे पाऊल आंदोलनकर्त्यांनी उचलले. शिवसंग्राम युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के व इतर पदाधिकारी यावेळी अग्रभागी होते. तथापि, शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक आ. विनायक मेटे यांनी शेतकऱ्यांसाठी सरकारविरोधात रान पेटविण्याचा इशाराही आधीच दिला आहे.
दुसरीकडे शिवसेनेच्या वळचणीला असलेले चारा छावणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जटाळ यांनीही सत्ताधाऱ्यांविरुद्ध पत्रक काढले आहे. शेतकऱ्यांची सरकारला जाणीव नाही, असे त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे सरकारचे धोरण आहे काय? असा संतप्त सवाल जटाळ यांनी उपस्थित केला आहे. सरकारविरोधात थेट मंत्रालयावर रुमणे मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, राज्यातील सत्तेपासून दूर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अद्याप आक्रमक पवित्रा घेतलेला नसल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)