एक वर्षांपासून औट्रम घाट बंद, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या अर्थकारणाला ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 12:45 PM2024-08-13T12:45:05+5:302024-08-13T12:50:02+5:30
औट्रम घाटातील बोगद्याच्या कामासाठी संघर्ष समितीचे साखळी उपोषण
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय महामार्ग सोलापूर-धुळेवरील कन्नडनजीकच्या औट्रम घाट जडवाहतुकीसाठी बंद करण्याच्या कोर्टाच्या आदेशाला एक वर्ष झाले आहे. घाट जड वाहतुकीस बंद असल्यामुळे जिल्ह्यासह कन्नड तालुक्यातील अर्थकारणाला ब्रेक लागला असून, औट्रम घाटातील १४ वर्षांपासून रखडलेले बोगद्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू करावे. या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग ५२ व छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव नियोजित रेल्वेमार्ग संघर्ष समितीने विभागीय आयुक्तालयावर सोमवारपासून साखळी उपोषण सुरू केले आहे.
माजी जि. प. अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वात अशोक दाबके, सदाशिव पाटील, जगन्नाथ खोसरे, अशोक कुमावत, अंकुश जाधव, परसराम घुगे, अब्दुल वहाब, बंटी सातदिवे, प्रकाश काचोळे, आर. एस. पवार आदींनी उपोषणात सहभाग नोंदविला. समितीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, औट्रम घाटातील १४ कि.मी.चा बोगदा वगळता महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. वाहतूक जाम होत असल्यामुळे घाट जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. कसाबखेडा फाट्यावरून शिऊर बंगला ते येवला-नांदगावमार्गे वाहतूक सध्या सुरू आहे. १२० कि.मी.चा हा फेरा मारून चाळीसगावमार्गे धुळे हायवेला जावे लागते. यात मोठ्या प्रमाणात इंधनाचा तोटा आहे. बोगद्याच्या कामासाठी डीपीआर बनिवणे, दगडाच्या चाचण्या घेणे, तज्ज्ञांचा सल्ला घेणे. ही सगळी प्रक्रिया गेल्या दशकात झाली. तीन हजार कोटींमध्ये बोगद्याचे काम होणार होते. परंतु त्यावर केंद्र शासनाने निर्णय घेतला नाही. आता बोगद्याचे काम सहा हजार कोटींहून अधिक खर्चापर्यंत गेले आहे. त्यातच केंद्र शासनाने बोगद्याचे काम रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. पर्यायी मार्गाचा विचार करण्याच्या सूचना शासनाने केल्या. त्यावरही अद्याप काहीही निर्णय झाला नाही. दरम्यान, माजी खा. चंद्रकांत खैरे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक रवींद्र इंगोले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतील. उपोषणकर्त्यांची मागणी एनएचएआयच्या मुख्यालयास पाठविण्यात येईल, असे नमूद केले.
उद्योगांसह सर्व अर्थकारणाला फटका...
पेट्रोलपंप, हॉटेलचालक, शेतकरी, व्यापारी, उद्योगांना घाट बंद असल्यामुळे फटका बसला आहे. त्यामुळे बोगद्याचे काम सुरू करावे. कन्नड-वैजापूर व अंधानेर, कोळवाडी, जेहूर या मार्गावर उड्डाणपूल बांधावा, भांबरवाडी ते कसाबखेड्यापर्यंत सर्व्हिसरोड बांधावा. महामार्गालगत ऑक्सिजन निर्मिती करणारे वृक्ष लावावेत. अशा मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत.