औट्रम घाट जड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद;शेतकरी,पेट्रोलपंप,हॉटेल,गॅरेजच्या व्यवसायावर गदा!
By विकास राऊत | Published: September 14, 2023 01:13 PM2023-09-14T13:13:45+5:302023-09-14T13:16:24+5:30
कन्नडमार्गे चाळीसगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील औट्रम ११ कि.मी.च्या घाटात वाहतूक खोळंबत असल्याने तो बंद केला आहे.
छत्रपती संभाजीनगर : नॅशनल हायवे क्र. २११ (५२) सोलापूर ते धुळे या महामार्गावर असलेल्या कन्नड व चाळीसगावच्या मधील औट्रम घाटातील बोगद्याचे काम रद्द करण्याचा निर्णय होऊन वर्ष झाले आहे. महिनाभरापासून तो घाटही जड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद आहे. यामुळे मार्गावरील पेट्रोल पंप, हॉटेल, गॅरेजच्या व्यवसायावर गदा आली आहे. घाट बंद आणि अर्थकारण ठप्प, अशी परिस्थिती आहे.
कन्नडमार्गे चाळीसगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील औट्रम ११ कि.मी.च्या घाटात वाहतूक खोळंबत असल्याने तो बंद केला आहे. मागील काही वर्षांपासून त्या घाटाला पर्यायी मार्ग नाही. रोज १२ हजारांहून अधिक वाहनांच्या राबत्यावर पेट्रोल पंप, हॉटेल, गॅरेजच्या व्यवसायाची रोजी-रोटी अवलंबून होती. घाट जड वाहतुकीला बंद असल्यामुळे हे अर्थकारण बंद पडले. आता ही वाहतूक धुळे ते मनमाड, अहमदनगर, पुणे ते सोलापूर व दक्षिण भारताकडे जात असल्याने घाटामागील व पुढील महामार्गावरील व्यावसायिक हताश आहेत.
शेतकऱ्यांचेही नुकसान....
घाटाच्या पलीकडून येणारा भाजीपाला शेतकरी कन्नड व छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने आणतात. परंतु ती वाहने देखील इतर मार्गाने जात आहेत. परिणामी, शेतकऱ्यांचे अर्थकारणही कोलमडले आहे. तर वाहतूक लांबून होत असल्यामुळे भाजीपाला महागला आहे.
घाट एक, संकटे अनेक....
साडेपाच ते ६ हजार कोटींवर औट्रम बोगद्याच्या कामाचा खर्च गेल्यामुळे खर्चात कपात करण्याचा ‘घाट’ एनएचएआयने घातला. नवीन पर्याय शोधण्याच्या डीपीआरलाही एजन्सीअभावी ग्रहण लागले. पर्याय शोधण्यासाठी तीन वेळा डीपीआरसाठी निविदा मागविल्या. परंतु कुठलीही एजन्सी पुढे न आल्यामुळे औट्रम घाटामागे लागलेले संकट कायम आहे.
आम्ही गुंतवणूक करून चूक केली का...?
सोलापूर-धुळे हायवे बांधण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या सेवेसाठी असलेले हॉटेल्स, गॅरेज, पेट्रोलपंप चालकांचे सध्या हाल सुरू आहेत. घाट बंद असून जड वाहनांसह इतर वाहनेदेखील औरंगाबाद जिल्ह्याच्या हद्दीतून येत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहेच; शिवाय ६ हजारांवरून २ हजार लिटर इंधन विक्री झाली आहे. गॅरेज, हॉटेल्स चालकांचे तर प्रचंड नुकसान होत आहे. महामार्गावर गुंतवणूक करून चूक केल्यासारखे वाटते आहे.
-विश्वदीप करंजीकर, पेट्रोल पंपचालक