औट्रम घाट वाहतुकीला बंद; प्रशासनाची कोंडी, पर्यायी रस्त्यासाठी शोध सुरू

By विकास राऊत | Published: February 8, 2024 12:10 PM2024-02-08T12:10:11+5:302024-02-08T12:10:34+5:30

ऑगस्ट २०२३ पासून घाटही जड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद आहे. यामुळे मार्गावरील पेट्रोल पंप, हॉटेल, गॅरेजच्या व्यवसायावर गदा आली आहे.

Outram Ghat closed to traffic; Dilemma of administration, search for alternative road started | औट्रम घाट वाहतुकीला बंद; प्रशासनाची कोंडी, पर्यायी रस्त्यासाठी शोध सुरू

औट्रम घाट वाहतुकीला बंद; प्रशासनाची कोंडी, पर्यायी रस्त्यासाठी शोध सुरू

छत्रपती संभाजीनगर : कन्नडमार्गे चाळीसगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील औट्रम ११ किलोमीटरच्या घाटात वाहतूक खोळंबत असल्याने तो बंद केला आहे. मागील काही वर्षांपासून त्या घाटाला पर्यायी मार्ग नाही. तलवाडा घाटातील पर्यायी मार्ग उखडला असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय काढण्यासाठी प्रशासनाची पूर्णत: कोंडी झाली आहे.

तलवाडा घाटातील मार्गाची दुरूस्ती करायची असेल तर रोज ४ हजारांहून अधिक जड वाहनांची वाहतूक कुठून वळवायची, असा प्रश्न आहे. प्रभारी जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी नाशिक व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील पोलिस अधिकारी, सा. बां., एनएचएआय विभागांची बुधवारी बैठक घेतली. पर्यायी रस्त्यासाठी तातडीने पाहणी करण्याचे आदेश लोखंडे यांनी दिले.

नांदगाव, तलवाडा घाटमार्गे शिऊर ते देवगाव रंगारी या मार्गाने वाहतूक वळविली आहे. तलवाडा घाटात २ किलोमीटर आणि साडेपाच मीटर अरूंद रस्ता असून तो जंगलातून आहे. जड वाहतुकीमुळे हा रस्ता उखडला असून रोज वाहतूक खोळंबून अपघात होत आहेत. पर्यायी मार्गाविना त्या रस्त्याची दुरुस्ती शक्य नाही. नांदगाव ते येवलामार्गे वैजापूर ते गंगापूर किंवा लासूरमार्गे वाहतूक वळवावी लागेल. असे झाले तरच पर्यायी रस्त्याची दुरुस्ती होईल, असे सूत्रांनी सांगितले.

अर्थकारणाला खीळ....
ऑगस्ट २०२३ पासून घाटही जड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद आहे. यामुळे मार्गावरील पेट्रोल पंप, हॉटेल, गॅरेजच्या व्यवसायावर गदा आली आहे. घाट बंद आणि अर्थकारण ठप्प, अशी स्थिती आहे. घाटाच्या पलीकडून येणारा भाजीपाला शेतकरी कन्नड व छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येणे बंद झाले आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे अर्थकारणही कोलमडले.

घाट एक, संकटे अनेक....
नॅशनल हायवे क्र. २११ (५२) सोलापूर ते धुळे या महामार्गावर असलेल्या कन्नड व चाळीसगावच्या मधील औट्रम घाटातील बोगद्याचे काम आता होणार नाही. साडेपाच ते ६ हजार कोटींवर औट्रम बोगद्याच्या कामाचा खर्च गेल्यामुळे खर्चात कपात करूनही एनएचएआयला काही करता आले नाही. अखेर एनएचएआयने मुख्य कार्यालयाने घाटातील बोगद्याचे काम रद्द केले.

कोट्यवधींच्या उलाढालीस ब्रेक...?
सोलापूर-धुळे हायवेवरील टोलचे उत्पन्न घटले आहे. जड वाहनांसह इतर वाहनेदेखील जिल्ह्याच्या हद्दीतून येत नाहीत. ६ हजारांवरून २ हजार लिटर इंधनविक्री आली आहे. कोट्यवधींच्या उलाढालीस ब्रेक लागला आहे.
- विश्वदीप करंजीकर, पेट्रोल पंपचालक

Web Title: Outram Ghat closed to traffic; Dilemma of administration, search for alternative road started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.