उदंड झाले उमेदवार
By Admin | Published: September 28, 2014 12:25 AM2014-09-28T00:25:23+5:302014-09-28T01:04:23+5:30
औरंगाबाद : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच झुंबड उडाली.
औरंगाबाद : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच झुंबड उडाली. दिवसभरात तब्बल २०६ जणांनी आपले अर्ज दाखल केले. आतापर्यंत जिल्ह्यात नऊ मतदारसंघांमध्ये एकूण ३१९ जणांचे ४८० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी या सर्व अर्जांची छाननी होणार आहे, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १ आॅक्टोबर आहे.
राज्यात विधानसभेसाठी १५ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शनिवार, दि.२० सप्टेंबरपासून सुरू झाली होती. जिल्ह्यातील सर्व नऊ मतदारसंघांत कालपर्यंत ११३ जणांचे १९५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे आज सर्व नऊ मतदारसंघांमध्ये अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली.
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून शनिवारी २१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये भाजपा उमेदवार मधुकर सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद दाभाडे, मनसेचे गौतम आमराव, भारिप- बहुजन महासंघाचे दीपक राऊत, रिपाइंच्या ज्योती म्हस्के आदींचा समावेश आहे.
औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून आज शिवसेनेच्या वतीने महापौर कला ओझा, भाजपाकडून अतुल सावे, बसपाकडून कचरू सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जुबेर मोतीवाला, मनसेच्या वतीने सुमित खांबेकर यांच्यासह एकूण ४० जणांनी उमेदवारी अर्ज भरले. औरंगाबाद मध्य मतदारसंघातून भाजपाच्या वतीने किशनचंद तनवाणी, काँग्रेसचे एम.एम. शेख, नगरसेवक अफसर खान यांच्यासह ३० पेक्षा जास्त जणांनी अर्ज भरले.
वैजापूरमधून १२ जणांनी १९ अर्ज दाखल केले. यामध्ये काँग्रेसचे दिनेश परदेशी, राष्ट्रवादीचे भाऊसाहेब चिकटगावकर, भाजपाच्या वतीने एकनाथ जाधव, मनसे कल्याण दांगोडे यांचा समावेश आहे.
कन्नडमधून १३ जणांनी अर्ज दाखल केले. यात सेनेचे हर्षवर्धन जाधव, काँग्रेसचे उमेदवार नामदेव पवार आदींचा समावेश आहे. सिल्लोडमध्येही आज काँग्रेसचे अब्दुल सत्तार, भाजपाचे सुरेश बनकर, शिवसेनेचे सुनील मिरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू मानकर यांच्यासह २८ जणांनी अर्ज दाखल केले.
गंगापूरमधून २८ जणांनी अर्ज भरले. राष्ट्रवादीचे कृष्णा पाटील डोणगावकर, काँग्रेसचे किरण पाटील डोणगावकर, शोभा खोसरे यांनी अर्ज दाखल केले. मनसेच्या बादशाह पटेल यांनीही अर्ज दाखल केला.
पैठण मतदारसंघातून २७ जणांनी अर्ज भरले यात काँग्रेसचे रवींद्र काळे, शिवसेनेचे संदीपान भुमरे, भाजपातर्फे विनायक पाटील हिवाळे, रासपचे रामनाथ चोरमले यांचा समावेश आहे.
फुलंब्रीतून १४ जाणांनी उमेदवारी अर्ज भरले. यात शिवसेनेचे राजेंद्र ठोंबरे आणि मनसेचे भास्कर गाडेकर यांचा समावेश आहे.
उमेदवारी अर्जांचे आतापर्यंत चित्र
मतदारसंघव्यक्ती अर्ज
सिल्लोड२८४२
कन्नड२३३७
फुलंब्री२३३२
औरंगाबाद मध्य५०७०
औरंगाबाद पश्चिम३३५२
औरंगाबाद पूर्व५७८५
पैठण४६६६
गंगापूर३९५९
वैजापूर२०३७
एकूण३१९४८०