पूरक आहारातील बिस्किटे खाल्ल्यानंतर झेडपी शाळेतील २०० च्यावर विद्यार्थ्यांना विषबाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 01:36 PM2024-08-17T13:36:27+5:302024-08-17T13:37:56+5:30
बिस्कीट खात असताना अचानक विद्यार्थ्यांना मळमळ होण्यास सुरुवात झाली. पैठण तालुक्यातील केकत जळगाव झेडपी शाळेतील घटना
- अनिल कुमार मेहेत्रे
पाचोड ( छत्रपती संभाजीनगर) : पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील तब्बल २०० च्या वर विद्यार्थ्यांना पूरक आहारात देण्यात आलेली बिस्किट खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शाळेत घडली. सर्व विद्यार्थ्यांवर पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
केकत जळगाव येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेत २९६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शनिवारी अर्धवेळ शाळा असल्यामुळे सकाळी आठ वाजेच्या सुमारास विद्यार्थी शाळेत आले होते. साडेआठ वाजेच्या सुमारास परिपाठ झाल्यानंतर शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पूरक आहार म्हणून पारले कंपनीचे बिस्कीट पुडे वाटप केले. बिस्कीट खात असताना अचानक विद्यार्थ्यांना मळमळ होण्यास सुरुवात झाली. शाळेत हजर असलेल्या सर्चव विद्यार्थ्यांना मळमळ होण्यास सुरुवात झाली. माहिती मिळताच सरपंच, पालक, गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत धाव घेत विद्यार्थ्यांना मिळेल त्या वाहनाने उपचारासाठी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला १०० च्या वर विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली दिसून येत होती.
यावेळी पाचोड ग्रामीण रुग्णालयात पालकांची एकच गर्दी झालेली दिसून येत होती. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदिपान काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नोमांन शेख , डॉ. बाबासाहेब घुगे, डॉ. राहुल दवणे, डॉ. अक्षय खरग, डॉ. वैष्णवी ठाकरे , डॉ. सोनाली गोंडगे यांनी विद्यार्थ्यांवर तत्काळ उपचार सुरू केले. विद्यार्थ्यांचा विषबाधाचा आकडा वाढत चालल्यामुळे वैद्यकीय अधीक्षक संदिपान काळे यांनी पाचोड येथील सर्वच खाजगी हॉस्पिटल मधील डॉक्टरांना ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थ्यांना उपचार करण्यासाठी पाचारण केले.
घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात येऊन पाहणी केली. यावेळी पैठण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू भुमरे पाटील , सरपंच शिवराज भुमरे पाटील , उपसरपंच शिवाजी भालसिंगे पाटील , सोसायटीचे चेअरमन जिजा भुमरे पाटील , ग्रामपंचायत सदस्य अनिल भुमरे पाटील, केकत जळगाव येथील सरपंच जायभाये माजी सरपंच भीमराव थोरे, ज्ञानदेव बडे , शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे जिल्हा उपाध्यक्ष विलास शेळके पाटील , युवराज चावरे पाटील आदींनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मदत कार्यास सहकार्य केले. तसेच पैठण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीराम केदार, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अनिल पुदत, विहामांडवा केंद्राचे केंद्रप्रमुख मधुकर शेळके, पाचोड केंद्राचे केंद्रप्रमुख बळीराम भुमरे पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन पाहणी करत विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.