औरंगाबादेत आगामी सात दिवसांत सक्रिय कोरोना रुग्ण २३ हजारांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:02 AM2021-03-29T04:02:11+5:302021-03-29T04:02:11+5:30
संतोष हिरेमठ औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या आगामी सात दिवसांत म्हणजे ४ एप्रिलपर्यंत ९३ हजारांपर्यंत जाणार आहे. ...
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या आगामी सात दिवसांत म्हणजे ४ एप्रिलपर्यंत ९३ हजारांपर्यंत जाणार आहे. म्हणजे या कालावधीत जवळपास १६ हजार रुग्णांची भर पडणार आहे, तर सक्रिय रुग्णसंख्या २३ हजारांवर जाण्याचा अंदाज सार्वजनिक आरोग्य विभागाने वर्तविला आहे. यात ८० टक्के रुग्णांची प्रकृती सामान्य राहाणार आहे. पण उर्वरित २० टक्के रुग्णांसाठी जिल्ह्यातील ऑक्सिजन, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर अपुरे पडण्याची चिन्हे असून, या सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना जिल्हा पातळीवर करण्यात आली. त्यामुळे आगामी काही दिवस औरंगाबादकरांची परीक्षा घेणारे ठरण्याची भीती व्यक्त हाेत आहे.
जिल्ह्यात शनिवारपर्यंत (दि. २७) एकूण रुग्णांची संख्या ७७ हजार ३५० झाली, तर यापैकी ६० हजार २२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आरोग्य विभागाने ४ एप्रिल रोजी अपेक्षित असलेली कोरोना रुग्णांची अंदाजित आकडेवारी काढली आहे. ही आकडेवारी काढण्यासाठी मार्च २०२० पासून असलेली रुग्णसंख्या विचारात घेण्यात आली आहे. संभाव्य रुग्णसंख्येच्या प्रमाणात कमी पडणाऱ्या सुविधा जिल्हा स्तरावर योग्य ती तयारी करून पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहतील, याची खबरदारी घेण्याची सूचना जिल्हा शल्य चिकित्सक, मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
कोविड-१९ पोर्टलवर उपलब्ध सुविधांचा विचार करून ४ एप्रिलपर्यंत किती उपचार सुविधा, खाटा लागतील, याचाही अंदाज काढण्यात आला आहे. या अंदाजानुसार जिल्ह्यात विनाऑक्सिजन खाटा पुरेशा प्रमाणात आहेत. परंतु आयसीयू बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन खाटा कमी पडण्याची चिन्हे आरोग्य विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
उपलब्ध सुविधांची माहिती पोर्टलवर नियमितपणे अपडेट करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा पातळीवर सुविधा वाढविण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
---
अपेक्षित रुग्णसंख्या काढण्यासाठी या बाबींचा विचार
१) रुग्णवाढीचा दर
२) जिल्ह्याचा मृत्युदर
३) संभाव्य रुग्णसंख्येतून कोरोनामुक्तांची संख्या वजा करून संभाव्य सक्रिय रुग्णसंख्या.
-------
४ एप्रिलपर्यंत संभाव्य कोरोना रुग्णसंख्या
एकूण कोरोनाबाधित- ९३,६२३
कोरोनामुक्त रुग्ण- ६८,१०७
सक्रिय रुग्णसंख्या- २३,६०६
---------
संभाव्य सक्रिय रुग्णांसाठी आवश्यक खाटा
१) १५ टक्के रुग्णांना ऑक्सिजन बेड
२) ३ टक्के रुग्णांना आयसीयू बेड
३) २ टक्के रुग्णांना व्हेंटिलेटर
------
जिल्ह्यातील सोयीसुविधांची अवस्था
कोणत्या सुविधा -सध्या उपलब्ध - ४ एप्रिलपर्यंत आवश्यक
१) आयसोलेशन बेड (विनाऑक्सिजन)- १३,५३८ - ११,८०३
२) ऑक्सिजन बेड - १,८०१ - ३,५४१
३) आयसीयू बेड- ५५३ - ७०८
४) व्हेंटिलेटर - २६२ - ४७२
------------