पाच क्विंटलचा जादा तांदूळ साठा
By Admin | Published: January 1, 2017 11:51 PM2017-01-01T23:51:13+5:302017-01-01T23:51:54+5:30
बीड : येथील छत्रपती शाहू महाराज प्रा. विद्यालयात शालेय पोषण आहार विभागातील अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत पाच क्विंटल जादा तांदूळ साठा आढळून आला.
बीड : येथील छत्रपती शाहू महाराज प्रा. विद्यालयात शालेय पोषण आहार विभागातील अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत पाच क्विंटल जादा तांदूळ साठा आढळून आला. याप्रकरणी महिना उलटूनही मुख्याध्यापिकेने खुलासा सादर केला नाही. प्रशासनाकडूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.
जिजामाता शिक्षण प्रसारक संस्थेच्या छत्रपती शाहू महाराज प्रा. विद्यालय, शाहूनगर येथे शालेय पोषण आहार विभागाचे अधीक्षक एच. के. राठोड यांनी लेखाधिकाऱ्यांसमवेत महिन्यापूर्वी तपासणी केली होती. यावेळी पाच क्विंटल जादा तांदूळसाठा आढळून आला होता. शिवाय विद्यार्थी संख्या पाचशेच्या घरात असताना जेवणासाठीचे ताट केवळ २० असल्याचे समोर आले. खिचडीत डाळ व भाजीपाल्याचे प्रमाण जेमतेम होते. शालेय प्रशासनाने रोकडवही, कीर्द, प्रमाणक नोंदवही देण्यास टाळाटाळ केली. शिवाय पोषण आहारासंदर्भात बैठका होत नाहीत, असा ठपका राठोड यांनी ठेवला होता.
त्यांनी लेखाधिकाऱ्यांच्या संयुक्त स्वाक्षरीने मुख्याध्यापिका आर. एल. मोरे यांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, महिन्यानंतरही त्यांनी खुलासा दिलेला नाही. दरम्यान, याप्रकरणात प्रशासन वेळखाऊ भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुख्याध्यापिका आर. एल. मोरे म्हणाल्या, आम्हाला आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातील तांदूळ पुरवठा झालेला नाही. हा तांदूळ त्याआधीचा आहे. विद्यार्थी खिचडीविना राहू नयेत यासाठी आम्ही त्याचा जपून वापर करत आहोत. आरोपांमध्ये तथ्यता नाही, असा दावाही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
यासंदर्भात शिक्षणाधिकारी (प्रा.) शशिकांत हिंगोणेकर म्हणाले, तपासणीत दोषी आढळलेल्यांची गय केली जाणार नाही. नियमाप्रमाणे योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येतील. (प्रतिनिधी)