काळाच्या ओघात अंतरपाटही बदलला;‘प्रिंटेड’ डिझायनर अंतरपाटाने सोहळा अविस्मरणीय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 07:05 PM2022-04-08T19:05:52+5:302022-04-08T19:05:52+5:30
लग्न असो वा मुंज; अंतरपाटाशिवाय मंगलाष्टक सुरूच होत नाही.
औरंगाबाद : नवरा-नवरी यांच्यामध्ये अंतरपाट धरल्याशिवाय मंगलाष्टक सुरू होत नाही, एवढे महत्त्व अंतरपाटाला असते. काळाच्या ओघात आता अंतरपाटही प्रिंटेड झाले आहेत.
साध्या अंतरपाटाला आता कोणी खरेदीदार मिळत नाही. हा बदल लग्नसराईत बघण्यास मिळत आहे. लग्न असो वा मुंज; अंतरपाटाशिवाय मंगलाष्टक सुरूच होत नाही. आजही रूढी परंपरा कायम टिकून आहेत. आधी कापडी अंतरपाट ‘प्लेन’ असत. त्यावर गुरुजी हळदी, कुंकवाने स्वस्तिक साकारत आणि मग तो अंतरपाट धरला जात असे. काळ बदलत आहे. त्यानुसार आता साध्या प्लेन अंतरपाटही डिझायनर झाला आहे. रेशमी अंतरपाटावर स्वस्तिक, वरात, मंगल कलश, वधू-वराचे प्रतीकात्मक छायाचित्र, शुभ-लाभ, शुभ विवाह, सनई-चौघडावादन असे प्रिटिंग केले जात आहे. हेच अंतरपाट आता खरेदी केले जात आहेत.
लग्नाचे सर्व नियोजन आता इव्हेंट मॅनेजमेंटकडे गेल्याने. लग्नात लागणाऱ्या प्रत्येक साहित्यात नावीन्यता, कल्पकता आणली जात आहे. अविस्मरणीय सोहळा होण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले जात आहे. त्यात आता अंतरपाटही सुटले नाहीत. तेही डिझायनर झाले आहेत, अशी माहिती डिझायनर नीलेश मालानी यांनी दिली.
अंतरपाटाची लांबी रुंदी
लग्नात किंवा मुंजीत वापरण्यात येणाऱ्या अंतरपाटाची लांबी रूंदी ४ बाय ५ फूट व ४ बाय ६ फुटांची असते.
अडीच हजारांपर्यंत अंतरपाट
लग्न-मुंजीसाठी अंतरपाटाची किंमत ३०० रुपये ते ११०० रुपये दरम्यान असते. काही हौशी लोक अंतरपाटाला असे सजवितात की, अडीच हजार रुपयांपर्यंतही खर्च जातो.
शिल्लक लग्नतिथी
एप्रिल- १५, १७, १९, २१, २४, २५. मे- ४, १०,१३,१४, १८, २०, २१, २२, २५, २६, २७. जून- १, ६,८,११,१३, १४,१५, १६, १८, २२.
जुलै- ३, ५, ६,७,८,९.
मुंजीच्या तिथी
एप्रिल - ६, ११, १३, २१.
मे- ५,६,११,१८.
जून- १, २, १६.