मराठवाड्यातील ९ मंडळांत अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:48 AM2017-08-29T00:48:09+5:302017-08-29T00:48:09+5:30
मराठवाड्यात रविवारी रात्री झालेल्या पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावली असून, ९ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठवाड्यात रविवारी रात्री झालेल्या पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावली असून, ९ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विभागात १७.६६ मि.मी. पाऊस झाला. हिंगोली, बीड, उस्मानाबादमध्ये जास्तीच्या पावसाची नोंद झाली आहे.
औरंगाबादमध्ये २, हिंगोलीतील २, बीडमधील ५ मंडळांत अतिवृष्टी झाल्याचे विभागीय आयुक्तालयातील महसूल विभागाने कळविले आहे. उर्वरित जालना, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला.
औरंगाबाद जिल्ह्यातील हर्सूल मंडळात ९४ मि.मी., चिकलठाणा मंडळात ७६ मि.मी., हिंगोलीतील साखरा मंडळात ९४, तर हत्ता येथे ९८ मि.मी., बीड जिल्ह्यातील मांजरसुंभा ७८ मि.मी., नेकनूर ७२, थेरला ८५, अमळनेर ७६, धामणगाव मंडळात ७६ मि.मी. पावसाची नोंद झाली. १९ ते २२ आॅगस्ट आणि त्यानंतर २७ आॅगस्ट रोजी झालेल्या पावसामुळे रबी हंगामाच्या नियोजनाचा विचार सुरू झाला आहे.
खरीप हंगामात विमा उतरविलेले शेतकरी, सध्या झालेला पाऊस आणि रबी हंगामाच्या सुरुवातीच्या धर्तीवर माहिती संकलन करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे विभागीय आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले.