कर्ज न भरण्याची शपथ

By Admin | Published: June 28, 2017 12:28 AM2017-06-28T00:28:10+5:302017-06-28T00:29:27+5:30

नांदेड: शासन निर्णयानुसार नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रूपये कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही़

Owe | कर्ज न भरण्याची शपथ

कर्ज न भरण्याची शपथ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: शासन निर्णयानुसार नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रूपये कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही़ या निर्णयाने संतापलेल्या चालू बाकीदार शेतकऱ्यांनी नियमित कर्ज फेडणे हा गुन्हा आहे का, असा प्रश्न उपस्थित केला़ तसेच अर्धापूर तालुक्यातील शंभरांवर शेतकऱ्यांनी एकत्र येत यापुढे कर्ज न भरण्याची सामूहिक शपथ घेतली़ दरम्यान, तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले़
मराठवाड्यातील शेतकरी संपाची ठिणगी अर्धापूर तालुक्यातूनच पडली होती़ त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात अर्धापूर तालुक्यातील शेतकरी संपकाळात रस्त्यावर उतरले होते़ दरम्यान, कर्जमाफीवर चर्चा करण्यासाठी आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी अर्धापूर येथील लंगडे कॉम्प्लेक्स येथे शेतकऱ्यांच्या वतीने मंगळवारी बैठक घेण्यात आली़ थकबाकीदार शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपये कर्जमाफी देण्याच्या निर्णयाबद्दल कुणाचेही दुमत नाही़, परंतु जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करून चालू बाकीदार आहेत, त्यांना प्रोत्साहन अनुदान देत कर्जमाफीच्या लाभापासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली़ चालू बाकीदार शेतकऱ्यांना थकित शेतकऱ्यांप्रमाणे कर्जमाफी मिळावी, यासाठी शासनाच्या विरोधात आंदोलन उभारण्याचा संकल्प करुन कर्ज न भरण्याची शपथ उपस्थित शेकडो शेतकऱ्यांनी घेतली.
तसेच या अन्यायाविरोधात आंदोलन उभे करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा रस्त्यावर येण्याची गरज असल्याचे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे गव्हाणे यांनी सांगितले़ यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड़ किशोर देशमुख, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष बालाजी आबादार, युवक काँग्रेसचे सरचिटणीस दत्ता पाटील बंडाळे, माजी सरपंच उद्धवराव राजेगोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील टेकाळे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमाकांत तिडके, सरपंच शहानंद मुधळ, संजय कंकाळ, अ‍ॅड़ बालाजी कदम, उत्तमराव मुधळ, बालाजी मुधळ, केशव डाढाळे, सुदाम बंडाळे, नगरसेवक शिवराज जाधव, तुकाराम साखरे, बबनराव बंडाळे, डिगा बंडाळे, समद खान पठाण, बालाजी कदम, मारोती जाधव, दत्तराव क्षीरसागर, बालाजी कानोडे, नारायण मुधळ, बहिर्जी वानखेडे, ज्ञानेश राजेगोरे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते़ त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़

Web Title: Owe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.