ऑक्सिजनअभावी रुग्णाचा रात्रभर रुग्णवाहिकेत मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 12:51 PM2020-10-07T12:51:02+5:302020-10-07T12:51:34+5:30
जरंडी ता.सोयगाव येथील कोविड केंद्रातील एका रूग्ण महिलेला ऑक्सिजन अभावी रात्रभर रूग्णवाहिकेतच मुक्काम करावा लागला. यामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांविषयी चिंता व्यक्त होत आहे.
सोयगाव : जरंडी ता.सोयगाव येथील कोविड केंद्रातील एका रूग्ण महिलेला ऑक्सिजन अभावी रात्रभर रूग्णवाहिकेतच मुक्काम करावा लागला. यामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांविषयी चिंता व्यक्त होत आहे.
सदरील महिला रुग्णाला सिल्लोड येथील सेंटरमध्ये बेड उपलब्ध नसल्याने उपचारासाठी दाखल घेतले नाही. या सकारात्मक रुग्णाला ऑक्सिजनच्या शोधात रुग्णवाहिकेतच रात्रभर प्रवास करावा लागल्याची घटना सोमवार दि. ५ रोजी रात्री उघडकीस आली. अखेरीस मंगळवारी मध्यरात्री पाचोरा येथील खासगी रुग्णालयात या रुग्णाला ऑक्सिजन बेडची व्यवस्था झाल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले.
जरंडी येथील कोविड केंद्रात ऑक्सिजन बेडची सुविधा चार महिन्यांपासून करण्यात आलेली नाही. त्यामुळे या कोविड केंद्रातून ऑक्सिजनअभावी गंभीर झालेल्या ३० पेक्षा अधिक रुग्णांना सिल्लोड आणि मिनी घाटी येथे उपचारासाठी पाठविण्यात येत आहे. परंतु सध्याच्या स्थितीत सिल्लोड उपजिल्हा रुग्णालय आणि मिनी घाटी क्षमतेपेक्षा जास्त भरल्याने जरंडी कोविड केंद्रातून रेफर करण्यात आलेल्या रुग्णांना सिल्लोडला ऑक्सिजन बेड मिळत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे.