रुग्णालयांतच ऑक्सिजन निर्मिती, तरीही सिलिंडरवर होतोय खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 06:04 PM2022-01-05T18:04:24+5:302022-01-05T18:04:48+5:30
प्रकल्प बसविले, पण सिलिंडर भरणाऱ्या यंत्रणेचा विसर पडल्याची घाटी, जिल्हा रुग्णालयांतील स्थिती
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी घाटी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले. या प्रकल्पामुळे ही रुग्णालये ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होतील, अशी अपेक्षा होती. मात्र या प्रकल्पातून सिलिंडरमध्ये ऑक्सिजन भरण्याची यंत्रणाच बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे महिन्याकाठी सिलिंडरवर हजारो रुपये खर्च करण्याची वेळ या रुग्णालयांवर ओढवत आहे.
घाटी रुग्णालयात ३, तर जिल्हा रुग्णालयात एक ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आहे. या प्रकल्पांद्वारे हवेतील ऑक्सिजन घेऊन रुग्णांना पुरविण्यात येतो. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प असलेल्या खासगी रुग्णालये काॅम्प्रेसर सिस्टिमद्वारे सिलिंडरमध्ये ऑक्सिजन भरून ठेवतात. परंतु घाटी आणि जिल्हा रुग्णालयात अशी कोणतीही यंत्रणा नाही. प्रकल्पातील टँकमधून ऑक्सिजन थेट रुग्णांपर्यंत पोहोचविण्याचीच यंत्रणा आहे.
१० टक्के सिलिंडर गरजेचे
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार रुग्णालयात ७० टक्के ऑक्सिजन हा लिक्विड ऑक्सिजन (एलएमओ), २० टक्के ऑक्सिजन हा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून, तर १० टक्के ऑक्सिजन सिलिंडरमधून देण्याचे नमूद केले आहे. हा १० टक्के ऑक्सिजन रुग्णालयातूनच भरला गेला, तर वर्षाकाठी लाखो रुपयांची बचत शक्य असल्याचे सांगण्यात येते.
एका सिलिंडरच्या रिफिलिंगसाठी १५० ते २०० रुपये
एका ऑक्सिजन सिलिंडरच्या रिफिलिंगसाठी १५० ते २०० रुपये खर्च येत असल्याचे एजन्सीतर्फे सांगण्यात आले. प्रत्येक रुग्णालयानुसार हा खर्च कमी - अधिक राहू शकतो. घाटी रुग्णालयाला महिन्याला जवळपास २ हजार सिलिंडर लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नियोजन सुरू
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून सिलिंडरमध्ये ऑक्सिजन भरण्यासाठी काॅम्प्रेसर लागतो. त्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. सध्या ऑक्सिजन प्रकल्पातून रुग्णांपर्यंत ऑक्सिजन पुरविला जातो.
- डाॅ. श्रीनिवास गडप्पा, उपअधिष्ठाता, घाटी
रिफिलिंग नाही
जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आहे. त्यातून सिलिंडरचे रिफिलिंग होत नाही. सध्या रुग्णसंख्या कमी आहे. त्यामुळे ऑक्सिजन लागण्याचे प्रमाण कमी आहे.
- डाॅ. प्रदीप कुलकर्णी, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक
१० ते ४० लाखांचा खर्च
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून सिलिंडर रिफिलिंग करण्यासाठी काँप्रेसर लागतो. त्यासाठी क्षमतेनुसार १० ते ४० लाख रुपयांचा खर्च येतो. सिलिंडर रिफिलिंगच्या माध्यमातून एका वर्षात हा खर्च निघू शकतो.
- सुजित जैन, ऑक्सिजन प्लांट ॲडव्हाईजर