ऑक्सिजनचा पुरवठा कमीच, मराठवाड्याला प्रतिदिन २२५ मेट्रिक टन ऑक्सिजन हवा : अंबादास दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:04 AM2021-04-18T04:04:46+5:302021-04-18T04:04:46+5:30
औरंगाबाद : मागील काही दिवसात मराठवाड्यात मागणीच्या प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. तो नियमितपणे उपलब्ध व्हावा. सध्या मराठवाड्याला प्रतिदिन ...
औरंगाबाद : मागील काही दिवसात मराठवाड्यात मागणीच्या प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. तो नियमितपणे उपलब्ध व्हावा. सध्या मराठवाड्याला प्रतिदिन २२५ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज असल्याचे शिवसेना प्रवक्ते, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
मुरबाड येथील लिंडेकडून उपलब्ध होणारा द्रवरूप ऑक्सिजन नाशिक, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांकरिता राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे तेथून मराठवाड्याच्या कोणत्याही जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा होत नाही. डोलवी (जिल्हा रायगड) येथूनही मराठवाड्याला ऑक्सिजन अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. या स्रोतांचे सनियंत्रण हे लिंडे - मुरबाड यांच्यामार्फत करण्यात येत आहे. चाकण प्लांटकडून औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजनचा वापर केला जात आहे. ही सर्व परिस्थिती पाहता, मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात कोणत्या कंपनीकडून ऑक्सिजन प्राप्त होईल, याबाबतचे लेखी आदेश तातडीने निर्गमित होणे अत्यंत आवश्यक आहे, यावर दानवे यांनी भर दिला आहे.
मराठवाड्याची प्रतिदिन २२५ मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी ही साधारण २० एप्रिलपर्यंत राहील. त्यामुळे १५ एप्रिलनंतर कमीत कमी २२५ मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता भासेल, अशी माहिती देऊन आमदार दानवे म्हणाले, मागील आठवड्यात आवश्यक ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत झाला. रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध न झाल्यास रुग्ण अतिगंभीर होण्याचा धोका आहे. रूग्णालयातील प्रत्यक्ष परिस्थिती बघितल्यास साधारणतः प्रतिरुग्ण प्रतिमिनिट २१ लीटर या प्रमाणात ऑक्सिजनचा वापर होत आहे. ऑक्सिजन पाईपचे लिकेजेस व गरजेइतका ऑक्सिजन रुग्णांना मिळत आहे का, याबाबत रुग्णालयातील ऑक्सिजनचे ऑडिट करून प्रत्यक्ष उपाययोजना करणे चालू आहे. याकरिता अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे.
मराठवाड्याला प्रतिदिन २२५ मेट्रिक टन नियमित ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाला आपल्या स्तरावरून निर्देशित करावे, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.